मिरज : काळ्या खणीजवळील अतिक्रमित घरे पाडण्यात आली.
Published on
:
01 Feb 2025, 12:28 am
Updated on
:
01 Feb 2025, 12:28 am
मिरज : येथील काळ्या खणीजवळ सुमारे 25 ते 30 वर्षांपूर्वीची अतिक्रमण करण्यात आलेली 15 घरे शुक्रवारी महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केली. लक्ष्मी मार्केट परिसरातीलही फुटपाथवर करण्यात आलेले अतिक्रमण हटवण्यात आले. उपायुक्त वैभव साबळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
मिरजेतील काळ्या खणीचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या सुशोभीकरणासाठी सुमारे 8 कोटी 65 लाख रुपयांचा निधी गेल्या साडेचार वर्षांपासून मंजूर आहे; मात्र या ठिकाणी गेल्या 25 ते 30 वर्षांपूर्वीपासून सुमारे 20 घरांचे अतिक्रमण होते. त्यामुळे या काळ्या खणीच्या सुशोभीकरणासाठी अडथळा निर्माण झाला होता. मंजूर झालेला निधी पडून होता. येथे असणार्या घरांच्या मालकांना पक्की घरे देण्यात आली आहेत, तरीही तेथील अतिक्रमण कायम होते. महापालिकेने अतिक्रमणधारकांना नोटिसा दिल्या होत्या.
शुक्रवारी 20 पैकी 15 घरे जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. उर्वरित पाच घरांच्या मालकांना पक्की घरे काही दिवसांत देण्यात येणार आहेत. त्यानंतर त्यांचेही अतिक्रमण काढण्यात येणार आहे. हे अतिक्रमण काढल्यानंतर काळी खण परिसराच्या सुशोभीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे. उपायुक्त वैभव साबळे, सहायक आयुक्त अनिस मुल्ला, बांधकाम विभागाचे अभियंता भिंगारदिवे यांच्यासह बांधकाम विभाग व स्वच्छता विभागाचे कर्मचारी कारवाईत सहभागी झाले होते. या कारवाईनंतर अतिक्रमण निर्मूलन पथकाने लक्ष्मी मार्केट परिसरात आत आणि बाहेर दोन्ही बाजूला असणारे अतिक्रमण हटवले. त्यामुळे लक्ष्मी मार्केट येथील फूटपाथ रिकामा झाला.