मुंबई गुन्हे शाखेचा एक दरारा होता. मुंबईतली संघटित गुन्हेगारी मोडून काढण्याबरोबर हे शहर शांत व भयमुक्त करण्याचे धडाकेबाज काम गुन्हे शाखेच्या दमदार अधिकाऱयांनी केले होते. पण मुंबई पोलिसांचे नाक असलेल्या या गुन्हे शाखेची अवस्था आता बिकट झाली आहे. मुंबईची माहिती, गुन्हेगारांवर वचक असलेल्या अनुभवी अधिकाऱ्यांनाच बाजूला टाकल्याने गुन्हे शाखेची प्रतिष्ठा लयास गेल्याचे पोलीस वर्तुळात बोलले जात आहे.
बॉलीवूड अभिनेता ‘पद्मश्री’ सैफ अली खान याच्यावर बुधवारी रात्री त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात एका चोराकडून प्राणघातक हल्ला झाला. वांद्रे पोलीस ठाण्यापासून जवळच ही घटना घडली. गुन्हा करून आरोपी सटकला तरी तो इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाला. आरोपीचे फुटेज हाती असतानाही त्याला पकडण्यात पोलिसांना दोन दिवस उलटले तरी यश मिळालेले नाही. स्थानिक पोलिसांबरोबर गुन्हे शाखेची पथकेदेखील केवळ चाचपडताना दिसली. गेल्या तीन-चार वर्षांपासून गुन्हे शाखेचे कामकाज डळमळीत झाले आहे. मुंबईची खडान्खडा माहीत असणारे खबऱ्यांचे जबरदस्त नेटवर्क, गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण करणारे अधिकारी पूर्वी गुन्हे शाखेत होते; पण परिस्थिती आता बदलली आहे. सध्याचे चित्र मुंबई गुन्हे शाखेच्या लौकिकाला साजेसे नसल्याची खंत काही माजी अधिकारी व्यक्त करत आहेत.
नव्या अधिकाऱ्यांकडे कमान
आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत नेते, अभिनेते, बिल्डर, व्यावसायिक यांची अलिशान घरे आहेत. त्यामुळे खंडणी, धमकावणे, प्राणघातक हल्ले यांसारख्या घटना पूर्वी सराईत संघटित गुन्हेगारांकरवी व्हायच्या. पण गुन्हे शाखेच्या दमदार पोलीस अधिकारी, अंमलदारांनी अशा गुन्हेगारांचे पंबरडे साफ मोडून काढले होते. आता नवीन अधिकाऱयांकडे गुन्हे शाखा असल्याने गुन्हे प्रकटीकरण, गुन्हेगारांवरचा अंकुश कमी झाला असल्याचे पोलीस अधिकारी सांगतात.
खबरे उल्लू बनवतात
गुन्हे शाखेचा फारसा अनुभव नाही. खबऱ्यांचे तगडे नेटवर्क नाही. मुंबईची इत्थंभूत माहिती नाही अशा नवख्या अधिकाऱ्यांच्या हातात गुन्हे शाखेची कमान दिल्याने या शाखेचा दरारा संपल्याचे अधिकारी म्हणतात. गंभीर म्हणजे, ज्यांची साथ महत्त्वाची असते ते खबरेच पोलिसांना उल्लू बनवतात असेही सांगण्यात येते.