Published on
:
28 Nov 2024, 11:58 pm
Updated on
:
28 Nov 2024, 11:58 pm
बी. पी. डी. म्हणजे बॉर्डरलाईन पर्सनालिटी डिसऑर्डर विषयी लोकांमध्ये अनेक गैरसमज असतात. सर्वसाधारणपणे ही एक आरोग्य समस्या आहे, ज्यामध्ये व्यक्ती आक्रमक होतात किंवा सर्वसामान्य काम करण्यास अक्षम असतात. वास्तविक बी. पी. डी. या आजाराची ओळख बर्याचदा होऊच शकत नाही. तसेच त्याची कारणेही कळत नाहीत. त्यामुळे त्यावर उपचार होणे शक्य नसते. जागतिक आकडेवारीनुसार 80 ते 90 टक्के बीपीडी रुग्ण आयुष्यात लैंगिक शोषणाला किंवा शारीरिक शोषणाला बळी पडलेले असतात. आकडेवारीनुसार बीपीडीची संख्या ही महिलांमध्ये अधिक प्रमाणात असते. संशोधनानुसार पुरुषांच्या तुलनेत महिला बर्या होण्यासाठी मदत घेऊ इच्छितात.
वास्तवातील एकटेपणाला घाबरून जाणे. उदाहरणार्थ, एखादी प्रिय व्यक्ती थोड्या कालावधीसाठी लांब गेल्यास या व्यक्ती चिडतात किंवा विचित्र वागू लागतात. परस्पर संबंधात अस्थिरता निर्माण होणे. आपला जोडीदार खूप चांगला आहे किंवा खूप वाईट आहे, असे समजणे. नात्यांमधील चांगुलपणा तसेच कमतरता यांचे संतुलन न करता येणे. या व्याधीने ग्रस्त रुग्णांमध्ये स्वतःबद्दल स्वतःच्या मनात असंतुलन असल्याने सतत नोकरी बदलणे, आयुष्याच्या जोडीदार, सिद्धांत, तत्त्व, धर्म अगदी लैगिंक आवडी निवडींमध्येही बदल होताना पाहायला मिळतो. त्यामुळे सातत्याने स्वतःची ओळख शोधत राहतात.
अतिप्रमाणात खर्च, लैंगिक संबंध, अमली पदार्थांचे सेवन, बेदरकार वाहन हाकणे, अविचाराने निर्ण़य घेणे, सातत्याने आत्महत्येचा प्रयत्न, धमक्या देणे आणि स्वतःला नुकसान पोहोचवणे इत्यादी सवयी या व्याधीत आढळतात. स्वभावात सातत्याने बदल होणे, त्यामुळे आयुष्यात असंतुष्ट राहणे, चिडचिड किंवा भीती वाटणे, ही लक्षणे काही तासांपुरती दिसतात. या व्यक्तींना सतत एकटेपणा वाटत राहतो. तसेच त्यांचा इतरांवर विश्वास नसतो.
बीपीडी हा एक मानसिक रोग आहे. त्याचा चारित्र्य किंवा असंतुलित व्यक्तिमत्त्व असण्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे ह्या आजारावर औषधोपचार करण्यासाठी प्रशिक्षित थेरपिस्टची अवश्य मदत घेतली पाहिजे. त्याच्या उपचारांसााठी कॉग्निटीव्ह बिहेविअर थेरेपी, डायलॅक्टिकल बिहेविअर थेरेपी, आय मुव्हमेंट डिसेन्सिटायजेशन अँड रिप्रोसेसिंग इत्यादी थेरेपींचा वापर करण्यात येतो. या उपचारांबरोबरच रुग्णाचा स्वभाव स्थिर राखण्यासाठी औषधेही दिली जातात. अर्थात या थेरेपी किंवा उपचार पद्धती या रोगाच्या पूर्ण उपचारापैकी एक हिस्सा आहेत. हा आजार बरा होण्यासाठी वेळ, धैर्य आणि मेहनत लागते.
आजार बरा होण्यासाठी काही रणनीती
रुग्णाने स्वतःजवळ कायम एक किट ठेवावे ज्यामध्ये भावना अनियंत्रित झाल्यास पाचही इंद्रिये शांत कऱण्यासाठी काही गोष्टी असाव्यात. झिप लॉक पिशवीत परफ्यूम, मखमली कापड, मिंट किंवा पुदिना, घंटी आदी गोष्टी ठेवता येऊ शकतात. लक्ष केंद्रित करण्यासाठी किंवा एकाग्र होण्यास मदत करणारे व्यायाम किंवा कृती केल्यास त्यामुळे आराम मिळतो. यासाठी प्राणायाम, ध्यानधारणा उत्तम. बेचैनी किंवा अतिरागावर नियंत्रण मिळवण्यसाठी चेहरा थंड पाण्याने धुवा, आईस पॅक लावावा. यामुळे हृदयाचे ठोके शांत होतात. मेंदू आणि मन दोन्हींकडे योग्य संतुलित प्रमाणात रक्तप्रवाह होतो. काही मिनिटे जॉगिंगसारखा व्यायाम केल्यास शरीराला आराम मिळतो. या रुग्णांना बरे करण्यासाठी कुटुंब आणि मित्रपरिवार यांचा पाठिंबा फार मोलाचा आहे. कोणत्याही परिस्थितीत रुग्णाला साथ दिली पाहिजे. रुग्णाला बेचैन वाटू लागले, तर त्याला प्रेमाचे चार शब्द सांगावेत. तसेच त्यांची अवस्था समजून घेत असल्याचे त्यांना कळले, तर त्याचीही मदतच होते.