दिल्लीतील पराभव दिसत आहे, म्हणूनच राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न सुरू केल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली होती. फडणवीस यांच्या या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री कोणी बसला म्हणून शहाणा ठरत नाही, अशी टीका करतानाच फडणवीस यांचा राष्ट्रीय प्रश्नांचा अभ्यास कमी आहे. त्यांनी अभ्यास करावा, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली. राहुल गांधींनी संसदेत भाषण केलं. त्यावेळीही कालचेच मुद्दे मांडले होते. पंतप्रधान नरेंद्रम मोदींसमोर त्यांनी मतदानातील हेराफेरी मांडली. तेव्हा मोदींचा चेहरा काळा ठिक्कर पडला होता. राहुल गांधी यांनी पुरावे दिले. पण देवेंद्र फडणवीस यांच्या मनात भ्रम निर्माण झाला असेल. कारण त्यांच्या आजूबाजूला भ्रमिष्ट लोक आहेत. फडणवीस यांनी राष्ट्रीय प्रश्नांचा नीट अभ्यास करावा. मुख्यमंत्रीपदी बसलो किंवा केंद्रात कोणी मंत्री असेल म्हणून तो शहाणा असतो असं नाही. काही भाग्य योग असतात आणि काही फ्रॉड भाग्य योग असतात. फ्रॉड भाग्य योगाने झालेलं हे सरकार आहे, असा हल्लाच संजय राऊत यांनी चढवला.
तोपर्यंत दिल्लीत संधी नाही
देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्राचा अभ्यास कमी आहे. त्यांना राष्ट्रीय पातळीवर काम करायचं आहे. पण जोपर्यंत अमित शाह आहेत, तोपर्यंत त्यांना राष्ट्रीय पातळीवर काम करायला संधी मिळेल का याबाबत शंका आहे. फडणवीस दिल्लीत प्रचाराला गेले नसते तरी हाच निकाल आला असता. कारण निकाल आधीच ठरलेला होता, असा दावा संजय राऊत यांनी केला.
शिंदेंची मातोश्री दिल्लीत
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल दिल्लीत होते. त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. एकनाथ शिंदे यांची मातोश्री दिल्लीत आहे. तिथे त्यांना रात्रीच जावं लागतं. दिवसा कुणी भेटत नाही. हे महाराष्ट्रातील स्वाभिमानी नेते. दिल्लीत फिरत असतात, अशी टीका त्यांनी केली.
ओमर यांच्या मताशी सहमत
इंडिया आघाडीतील फुटीमुळेच दिल्लीतील आपची सत्ता गेल्याचं मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मी ओमर अब्दुल्लांच्या मताशी सहमत आहे. इंडिया ब्लॉक हा भाजपला हरवण्यासाठी केला होता. हरयाणात एकी असती आणि दिल्लीत एकी असती तर हा निकाल वेगळा असता. महाराष्ट्रात आमच्या सहकाऱ्यांनी संयम दाखवला असता तर आम्ही थोडं पुढे गेलो असतो, असं ते म्हणाले.