Published on
:
21 Jan 2025, 12:05 pm
Updated on
:
21 Jan 2025, 12:05 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : मोहम्मद शमी (Mohammed Shami) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना दिसण्याची वेळ जवळ येत आहे. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर मोहम्मद शमीने कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. तथापि, तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सतत्याने त्याची तंदुरुस्ती सिद्ध करत आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी त्याची निवड झाली आहेच, पण तो 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाचा भाग देखील आहे. दरम्यान, टी-20 संघात निवड झाल्यानंतर, मोहम्मद शमीला त्याच्या काही सहकाऱ्यांना मागे टाकण्याची संधी आहे. यासाठी त्याला फक्त काही विकेट्सची आवश्यकता आहे.
2022 मध्ये खेळला शेवटचा टी20 सामना
मोहम्मद शमीने 2022 च्या टी20 विश्वचषकात त्याचा शेवटचा टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्यावेळी भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना झाला होता. तो सामना टीम इंडियाने गमावला होता. यानंतर आता, दोन वर्षांहून अधिक काळानंतर शमी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळताना दिसेल. तो नुकताच दुखापतीतून सावरत असल्याने, त्याला त्याची लय परत मिळवण्यासाठी सर्व 5 सामन्यांमध्ये संधी दिली जाऊ शकते.
शमीची टी-20 आंतरराष्ट्रीय कारकीर्द
शमीने भारतासाठी फक्त 23 टी-20 सामने खेळले आहेत. यात त्याच्या नावावर 24 विकेट्स आहेत. या फॉरमॅटमध्ये, त्याची सरासरी 29.62 असून इकॉनॉमी रेट 8.94 आहे. तो फक्त 24 विकेट्स घेऊ शकला असला तरी, टी-20 मध्ये त्याच्या नावावर 200 हून अधिक विकेट्स आहेत. त्याची चमक आयपीएलमध्ये अनेक वेळा दिसून आली आहे.
‘या’ गोलंदाजांना मागे टाकण्याची संधी
शमी लवकरच हरभजन सिंग, आवेश खान आणि अगदी इरफान पठाण यांनाही मागे टाकण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. हरभजन सिंगने 28 टी-20 सामन्यांमध्ये 25, तर आवेश खानने 25 सामन्यांमध्ये 27 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच इरफान पठाणने 24 टी-20 सामन्यांमध्ये 28 विकेट्स घेतल्या आहेत. म्हणजे जर शमीच्या खात्यात आणखी पाच विकेट आल्या तर तिघा गोलंदाजांना मागे टाकेल.