चंद्रमौळी गणेश मंदिर जि. प. प्राथमिक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवताना टेक्निशियन नवनाथ चव्हाण.Pudhari Photo
Published on
:
01 Feb 2025, 12:35 am
Updated on
:
01 Feb 2025, 12:35 am
पोखरापूर : राज्यभरातील विद्यार्थीनींच्या संदर्भात घडलेल्या वाईट घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळेच्या पालकांनी शाळेच्या परिसरात सीसीटीव्ही बसवण्याची सातत्याने मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेत सोलापूर जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीतून सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागाने मोहोळ तालुक्यातील 56 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून यामुळे विद्यार्थ्यांसाठी सुरक्षितता निर्माण झाली आहे.
राज्यभरातील शाळा व शाळेच्या परिसरात घडत असलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत होते. यासंदर्भात सोलापूर जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमधील पालकांनी लोकवर्गणीतून शाळेच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले. राहिलेल्या शाळांमध्ये जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीतून जि. प. शिक्षण विभागाकडून पहिल्या टप्प्यात सोलापूर जिल्ह्यातील 394 जिल्हा परिषद शाळांमध्ये तर मोहोळ तालुक्यातील 56 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या जवळपास 2300 शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने सीसीटीव्ही कॅमेरेे बसवण्याची प्रक्रिया होणार आहे.
सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता दिवसेंदिवस वाढत आहे. मोहोळ शहरातील विद्यार्थी संख्या जास्त असलेल्या एकमेव जिल्हा परिषदेच्या चंद्रमौळी गणेश मंदिर जि. प. प्राथमिक शाळेतही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. सीसीटीव्ही युक्त जि. प. शाळा उपक्रमाबद्दल पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसवणारे टेक्निशन नवनाथ चव्हाण, पैगंबर शेख यांनी संपूर्ण कॅमेेर्यांची व इतर सिस्टमची माहिती दिली. यावेळी चंद्रमौळी गणेश मंदिर जि. प. शाळेचे मुख्याध्यापक खाजाप्पा कोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भारत नाईक, शिक्षक रेखा बनकर, सत्यवान खंदारे, अनुपमा क्षीरसागर, ज्योती डोंगरे आदी उपस्थित होते.
चंद्रमौळी गणेश मंदिर जि. प. शाळेची विद्यार्थी संख्या 200 च्या जवळपास आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शाळेच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेर्याची अत्यंत आवश्यकता होती. त्या संदर्भाने शिक्षण विभागाकडून 8 कॅमेरे मिळाल्यामुळे विद्यार्थी सुरक्षित झाले आहेत.
- भारत नाईक,अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती