Published on
:
01 Feb 2025, 12:48 am
Updated on
:
01 Feb 2025, 12:48 am
रत्नागिरी : लांजा-राजापूर मतदार संघाचे माजी आमदार आणि उपनेते राजन साळवी यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा सुरू झाली असली, तरी आपण योग्य वेळी योग्य निर्णय सांगू, अशी प्रतिक्रिया माजी आमदार राजन साळवी यांनी दिली आहे.
लांजा-राजापूरचे माजी आमदार राजन साळवी हे मागील काही दिवसांपासून पक्षात नाराज असून, विधानसभेला पक्षातून सहकार्य न मिळाल्याने पराभव झाल्याचे त्यांचे म्हणणे होते. मात्र, वरिष्ठांकडून त्यांच्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. भविष्यात भाजपला रत्नागिरी जिल्ह्यात संघटनेसाठी जीव तोडून काम करणारा चेहरा हवा असून, राजन साळवींनी भाजपत प्रवेश केल्यास पक्ष वाढीसाठी मोठा फायदा होणार आहे. भाजपाकडून वरिष्ठ पातळीवर त्यासाठी प्रयत्नही सुरु झाल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दोन दिवसात प्रवेश करणार असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे. मात्र, माजी आम. राजन साळवी यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावत, मी योग्य वेळी सर्वांनाच योग्य निर्णय सांगेन अशी प्रतिक्रिया दिली. माझ्या प्रवेशाची अनेकांना घाई असल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी मात्र अशी कोणतीच बोलणी झालेली नसल्याचे सांगितले. त्यामुळे आ. साळवी यांच्या पक्षप्रवेशाबाबत सस्पेंन्स कायम राहिला आहे.