Published on
:
18 Jan 2025, 1:12 am
Updated on
:
18 Jan 2025, 1:12 am
रत्नागिरी : रत्नागिरी शहरानजकिच्या मिरकरवाडा बंदरामध्ये मत्स्य व्यवसाय विभागाच्या जागेवर असलेली अनधिकृत बांधकामे हटवण्याचे निर्देश मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मत्स्य विभागाला दिले होते. त्यानुसार 16 जानेवारी रोजीच्या नोटीसांद्वारे पुढील 8 दिवसांत येथील अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी 319 बांधधारकांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
13 जानेवारी रोजी मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मत्स्य विभागाची बैठक रत्नागिरीत झाली होती. त्यावेळी मिरकरवाडा बंदरामध्ये मत्स्य व्यवसाय विभागाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम असलेल्या धारकांवर पोलिस विभागाचे संरक्षण घेऊन प्रशासनामार्फत हे अनधिकृत बांधकाम हटविण्याबाबत ना. राणे यांनी निर्देश दिले होते.
मिरकरवाडा बंदर हे महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या मालकीचे असून भूमापन क्र. 73/02 मध्ये 10.84 हे. आर एवढे क्षेत्र आहे. सदरच्या शासकीय जागेत कोणतेही बांधकाम करण्यास सक्त मनाई आहे. तरी सुद्धा या जागेमध्ये सुमारे 319 अनधिकृत बांधकामे अस्तित्वात आहेत. हे अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, मिरकरवाडा याच्या मार्फत बहुतांश वेळा नोटीस देण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर मत्स्य व्यवसाय विभागाने आता कारवाईचा बडगा उचलला आहे. त्यामुळे 16 जानेवारी रोजीच्या नोटीसांव्दारे पुढील 7 दिवसात अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी 319 धारकांना कायदेशीर नोटीस बजावणी करण्यात आली आहे.
मिरकरवाडा बंदरात प्राधिकरणाच्या कक्षेतील अनधिकृत बांधकाम धारकांनी विहित मुदतीच्या आत आपले अनधिकृत बांधकाम हटविण्यात यावे अन्यथा हे बांधकाम प्रशासनाकडून हटविण्यात येऊन यासाठी येणारा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल, असेही मत्स्य व्यवसाय विभागाकडून सांगण्यात आले आहे.