मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस file photo
Published on
:
07 Feb 2025, 5:17 pm
Updated on
:
07 Feb 2025, 5:17 pm
नागपूर : वारंवार खोटे नॅरिटीव्ह पसरवून जनतेची सहानुभूती मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न काँग्रेस करीत असली तरी, यात काहीही अर्थ नाही. आता दिल्ली विधानसभा निवडणुकीत होणारा दारुण पराभव समोर दिसत असल्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी बचावात्मक कव्हर फायरींग करीत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि.७) माध्यमांशी बोलताना केला. खासदार औद्योगिक महोत्सव उद्घाटन आणि नागपुरातील विविध कार्यक्रमांसाठी ते आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, वारंवार मतदान वाढीच्या संदर्भात संभ्रम करण्याचा प्रयत्न केला जात असला तरी कुठे किती मतदान वाढले याविषयीची सर्व स्पष्टता राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगाने वेळोवेळी केली आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा मतदान वाढले असा आरोप करण्यात अर्थ नाही. राहुल गांधी हे जोपर्यंत वस्तुस्थितीबाबत आत्मचिंतन करणार नाहीत, तोपर्यंत त्यांना व काँग्रेसला जनतेची सहानुभूती मिळणार नाही, असाही टोला त्यांनी यावेळी लगावला.