Published on
:
08 Feb 2025, 12:54 am
Updated on
:
08 Feb 2025, 12:54 am
सातारा : लाडकी बहिण योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. मात्र अनेक अपात्र महिलाही या योजनांचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा महिलांना या योजनेतून बाहेर काढण्यासाठी अर्जाची पडताळणी सुरु आहे. यासाठी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका घरोघरी जावून या योजनेचे निकष तपासणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील महिला लाभार्थी गॅसवर असल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषानुसार पात्र व अपात्र असलेल्या लाभार्थ्यांची पडताळणी करताना पहिल्यांदा चारचाकी वाहने असलेल्या महिलांची तपासणी केली जात आहे. त्यानंतर ज्या लाभार्थी कुटुंबातील सदस्यांकडे चारचाकी वाहन आहे, अशांची पडताळणी होईल. शेवटी ज्यावेळी योजनेचा अर्ज प्रत्येकास अॅन्ड्राईड मोबाईलवरुन भरता येत होता. त्यावेळी अनेकांनी कागदपत्रे बनावट देवून अर्ज केल्याचाही संशय असून असे प्रकार देखील समोर आले आहेत. त्यामुळे पुढील टप्प्यावर कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे.
सध्या चारचाकी वाहन ज्या महिलांच्या नावे आहेत. अशांची यादी जिल्हानिहाय पाठवण्यात आली आहे. ज्या महिलांच्या नावे चारचाकी वाहने आहेत आणि कोणत्या आरटीओ अधिकार्यांच्या काळातील त्यांची वाहन नोंदणी आहे याची नावे देखील यादीत आहेत. त्यानुसार प्राप्त यादी आणि तपासणी अहवाल याची राज्यस्तरावरुन पडताळणी होईल. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहेत. त्याची पडताळणीची प्रक्रिया सुरु आहे. त्याचा अहवाल शासनाला गेल्यानंतर योजनेतील किती लाभार्थी महिलांकडे वाहने आहेत हे स्पष्ट होणार आहे. ती नावे योजनेतून वगळली जाणार असून त्यांच्याकडून पूर्वीच्या लाभाची रक्कम वसूल होवू शकते.
महिला व बालकल्याण विभागाकडून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांना चारचाकी वाहने असलेल्या याद्या पाठवण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक तालुक्यातील लाभार्थ्यांच्या घरी बालविकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ), अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका सर्वेक्षण करणार आहेत. तसेच लाभार्थ्यांचे नाव आणि त्यांच्या घरात चारचाकी वाहन असलेल्या नावाची खातरजमा करून त्यावरून कुटुंबात चारचाकी वाहन असल्याची खात्री होताच त्या लाभार्थ्याचे नाव रद्द करण्याची शिफारस करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी सातारा जिल्ह्यातून मोबाईल अॅपवर 5 लाख 21 हजार 849 अर्ज आले होते. त्यापैकी 30 हजार 484 अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. तर 4 लाख 91 हजार 272 जिल्हाधिकार्यांकडे पाठवण्यात आले असल्याची माहिती संबंधित विभागामार्फत देण्यात आली आहे.
जिल्ह्यात दीड लाख चारचाकी वाहने...
सातारा जिल्ह्यात प्रादेशिक परिवहन कार्यालय सातार्याकडे 84 हजार 871, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय कराडकडे 39 हजार 325 व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय फलटणकडे 26 हजार 93 चारचाकी वाहनांची नोंदणी आहे. त्यामुळे जिल्ह्यात 1 लाख 50 हजार 289 वाहने असून त्यामध्ये कारसह अन्य वाहनांची नोंद आरटीओकडे आहे. त्यामुळे ज्या कुटुंबप्रमुखाच्या नावावर वाहनांची नोंद आहे त्या कुटंबातील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता कमी आहे.
खोटी माहिती दिल्यास कारवाई...
विधानसभा निवडणूकीपुर्वी महायुती सरकारने महत्वाकांक्षी योजना सुरू केली होती. या योजनेचा मोठ्या प्रमाणावर महिलांनी लाभ घेतला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा अर्ज करताना प्रत्येकांनी स्वाक्षरी करुन हमीपत्र भरुन दिले आहे. त्यात निकषानुसार योजनेच्या लाभासाठी पात्र असून अर्जातील माहिती खोटी आढळल्यास कारवाईस पात्र असेन असेही नमूद आहे. त्यामुळे गावागावात चारचाकी वाहनधारक महिलांची पडताळणी करताना कोणी खोटी माहिती दिली, तर संबंधितांवर गुन्हा दाखल होवू शकतो.