Published on
:
07 Feb 2025, 12:42 am
Updated on
:
07 Feb 2025, 12:42 am
मडगाव : विकृत मनोवृत्तीचा संशयित पॉल फोन्सेकाची आता पोलिस सखोल चौकशी करत आहेत. चौकशीत भयंकर माहिती उघड होत आहे. थिवी-माडेल येथील वडिलोपार्जित पोर्तुगीजकालीन घरात एकाकी राहणार्या 60 वर्षीय पॉलचा विकृत चेहरा त्या दुर्दैवी पालकांना ओळखता आला नाही. निष्पाप दोन अल्पवयीन भावंडांवर मागील एका वर्षापासून तो अत्याचार करत होता. त्या निरागस मुलांना मादक द्रव्य पाजून आक्षेपार्ह चित्रफीत पाहण्यासाठी तो जबरदस्ती करत होता. त्यानंतर तो त्या मुलांवर अत्याचार करायचा. डोके सुन्न करणार्या या प्रकरांमुळे नव्वदीच्या दशकातील कटू स्मृती जाग्या झाल्या आहेत. त्या काळात फ्रेडी पिट्स नावाच्या हैवानानेही अशाच प्रकारे 27 मुलांचे लैंगिक शोषण केले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिलोपार्जित घर आणि जमीन-जुमला असूनही पॉलने विवाह केलेला नाही. ना कुटुंब, ना मित्रपरिवार, ना कोणामध्ये मिसळणे, अशा परिस्थितीत आपले संपूर्ण आयुष्य आतापर्यंत पॉल जगत आहे. फोन्सेकाची दोन प्रकरणे समोर आली असून त्याच्या घरात सापडलेल्या वस्तूंवरून ती दोन प्रकरणे हिमनगाचे टोक असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिसांना त्याच्या घरात विद्यार्थ्यांचे शाळेतील असाइन्मेंट, लहान मुलींचे कपडे, महिलांची अंतर्वस्त्रे व साहित्य आढळले आहे. त्या साहित्यांवर मुलांची नावे असून पोलिस त्यांचा तपास करत आहेत. घराजवळी स्थानिकांशी चर्चा केली असता गावात त्याची वहिनी वगळता त्याचे अन्य कोणतेही नातेवाईक नसल्याचे त्यांनी सांगितले. थोडीफार वडिलोपार्जित मालमत्ता असलेला पॉल बेकार असून त्याने बर्याच वर्षांपासून आपल्या मित्रांशी संपर्क तोडलेला आहे. मद्याचे व्यसन असलेला पॉल दररोज संध्याकाळी नजिकच्या एका बारवर नित्यनियमाने जात होता. बर्याचदा त्या बारवर त्या अल्पवयीन मुलाला त्याच्यासोबत पाहण्यात आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्याचाराला बळी पडलेल्या त्या 11 वर्षीय अल्पवयीन मुलाने आर्थिक परिस्थितीमुळे शाळा सोडली आहे. त्याला आई-वडील, दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. हे कुटुंब बर्याच वर्षांपूर्वी गोव्यात आले असून मुलाचे वडील रोजंदारीवर काम करत होते. मात्र एका अपघातात त्यांच्या शरिराला गंभीर दुखापत झाल्यामुळे ते अंथरुणाला खिळून आहेत तर आईवर कुटुंबाला पोसण्यासाठी लोकांची धुणी-भांडी धुणी करण्याची वेळ आली आहे. भाड्याच्या खोलीत राहणार्या या कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची असल्याने त्यांची मदत करण्याच्या उद्देशाने पॉल याने त्यांच्याशी जवळीक साधण्यासाठी त्या अल्पवयीन मुलांचा आधार घेतला होता. मुलांना खेळणी आणि खाण्यापिण्याच्या वस्तू देऊन आई-वडिलांचा त्याने विश्वास संपादन केला. नियमित तो त्यांच्या घरी जात होता आणि दुचाकीवरून फिरवण्याच्या बहाण्याने आपल्या घरी नेत होता. त्या 11 वर्षीय अल्पवयीन मुलाला रात्रभर आपल्या घरी ठेवून त्याच्याबरोबर किळसवाणे कृत्य करायचा. त्या मुलाने पोलिस चौकशीत तो आपल्याला बाटलीतून काहीतरी कडू प्यायला देत होता, असे सांगितले आहे.
वासनांध राक्षसाने त्या अल्पवयीन मुलाच्या लहान भावालाही सोडले नाही. एकाकी असलेल्या पॉलकड़े सहानुभूतीने पाहणार्या पालकांना त्याच्या दुष्कर्माची कोणतीच माहिती नव्हती. तो स्वतःच्या नातवंडाप्रमाणे मुलांना वागवत आहे, असे गृहीत धरून पालकांनी मुलांना त्याच्याकडे पाठवले होते. पॉलची कर्मकांडे बाहेर पडल्यापासून थिवी परिसरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या दोन मुलांव्यतिरिक्त आणखीही मुले त्याच्या वासनेची शिकार बनली असावीत, असा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे.
सखोल चौकशीची मागणी : व्हिएगस
पॉल फोन्सेकाच्या या प्रकरणामुळे गोव्यात गाजलेल्या फ्रेडी पिट्स प्रकरणाच्या कटू स्मृती जाग्या झाल्या आहेत. अँग्लो जर्मन नागरिक असलेल्या फ्रेडीने आपल्या विदेशी सहकार्यांसह मिळून कोलवा येथे गुरुकुल नावाचे अनाथालय सुरू केले होते. त्या अनाथालयाच्या माध्यमातून तब्बल 27 अल्पवयीन मुलांचे त्याने व त्याच्या मित्रांनी लैंगिक शोषण केले होते. गरीब कुटुंबांना हेरून त्यांच्याशी सलगी वाढवत अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार करणार्या पॉल याची विकृत मानसिकता आणि गुन्हा करण्याची पद्धत फ्रेडीशी मिळती-जुळती आहे. कोलवाळ पोलिसांना पत्र लिहून या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केल्याचे बायलांचो एकवटच्या अध्यक्ष आवदा व्हिएगस यांनी सांगितले.