कोल्हापूर : ‘लॅब ऑन व्हिल्स’ या उपक्रमांतर्गत शालेय अभ्यासक्रमातील प्रयोग करताना पन्हाळा येथील शालेय विद्यार्र्थी. (छाया : नाज ट्रेनर)
Published on
:
07 Feb 2025, 12:36 am
Updated on
:
07 Feb 2025, 12:36 am
कोल्हापूर : पुस्तकी अभ्यासक्रमापलीकडे शिकवणार्या शिक्षकांची संख्या कमी होत असताना सध्या कोल्हापुरातील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रयोगाचे शिक्षण देण्यासाठी उपक्रमशील शिक्षकांनी विधायक पाउल उचलले आहे. पुणे येथील रीट या संस्थेच्या पुढाकाराने ‘लॅब ऑन व्हिल्स’ हा मोफत उपक्रम राबवला जातो. या माध्यमातून कोल्हापुरातील सांगरूळ येथील उमेद फाऊंडेशनच्या साथीने शालेय विद्यार्थ्यांना विज्ञानातील प्रयोगाचे ज्ञान आत्मसात करण्याची संधी मिळत आहे. जिल्ह्यातील प्रयोगशाळा नसलेल्या 13 शाळांतील विद्यार्थ्यांसाठी गेल्या दोन वर्षांपासून ही चाकावरची प्रयोगशाळा फिरत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 13 शाळांमध्ये प्रयोगशाळा नाहीत. यामध्ये पन्हाळा तालुक्यातील दोन, तर करवीर तालुक्यातील 11 शाळांचा समावेश आहे. या शाळेत शिक्षण घेणार्या पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमावर आधारित असलेले वैज्ञानिक प्रयोग करण्यात अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर पुणे येथे कार्यरत असलेल्या रीट या सामाजिक संस्थेच्या वतीने ‘लॅब ऑन व्हिल्स’ या उपक्रमातून जिल्ह्यातील प्रयोगशाळा नसलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ही फिरती प्रयोगशाळा सुरू झाली. रीट संस्थेमार्फत सध्या कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे या चार जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांपर्यंत ‘लॅब ऑन व्हिल्स’ संकल्पना पोहोचली आहे.
जिल्ह्यातील पन्हाळा, करवीर, शाहूवाडी या तालुक्यातील दुर्गम भागात भौतिक सुविधा उपलब्ध नसलेल्या शाळांची या उपक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. यासाठी उमेद फाऊंडेशनच्या वतीने शिक्षक समन्वयक नेमण्यात आले आहेत. गेल्या दोन वर्षांत दोन हजार विद्यार्थ्यांपर्यंत ही चाकावरची प्रयोगशाळा पोहोचली असून शालेय अभ्यासक्रमातील प्रयोग स्वत: करण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळाली आहे
रीट या संस्थेसोबत कोल्हापूर जिल्ह्यात ‘लॅब ऑन व्हिल्स’ हा उपक्रम सुरू आहे. उमेद फाऊंडेशनने यासाठी पुढाकार घेतला आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी लागून प्रयोग कौशल्य व संशोधन वृत्ती निर्माण होण्यास प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होत आहे.
प्रकाश गाताडे, शिक्षक, उमेद फाऊंडेशन