Published on
:
08 Feb 2025, 12:20 am
Updated on
:
08 Feb 2025, 12:20 am
आकर्षक त्वचा आणि कुशाग्र बुद्धी यामुळे कोणाचेही व्यक्तिमत्त्व प्रभावी होते. आपली त्वचा कशी आहे आणि आपले विचार कसे आहेत, हे आपल्या आहारावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. यामध्ये व्हिटॅमिन ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘डी’ या विविध घटकांचा समावेश असतो. परंतु, व्हिटॅमिन ‘एफ’देखील आहारात समाविष्ट करणे महत्त्वाचे आहे. याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नसते. व्हिटॅमिन ‘एफ’ आपल्या त्वचेचे, मेंदूचे आणि डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
व्हिटॅमिन ‘एफ’ हे वास्तवात एक व्हिटॅमिन म्हणजेच जीवनसत्त्व नाही. ते दोन प्रकारच्या पॉलिसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड-अल्फा लिनोलेनिक अॅसिड (एएलए) आणि लिनोलेइक अॅसिड (एलए) च्या मिश्रणाने बनते. ‘एएलए’ म्हणजे ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि ‘एलए’ म्हणजे ओमेगा 6 फॅटी अॅसिड. वैज्ञानिकांनी 1920 मध्ये ‘एएलए’ आणि ‘एलए’चा शोध घेतला आणि त्यांना व्हिटॅमिन समजून ते व्हिटॅमिन ‘एफ’ म्हणू लागले! आपल्या शरीरात हे व्हिटॅमिन नैसर्गिकरित्या तयार होत नाही. यासाठी ओमेगा फॅटी अॅसिड आहारात समाविष्ट करणे आवश्यक आहे, ज्यामुळे व्हिटॅमिन ‘एफ’ शरीराच्या पेशी तयार करतात.
कोरडी त्वचा रोखते : व्हिटॅमिन ‘एफ’ ओमेगा फॅटी अॅसिडने समृद्ध असते, जे त्वचेचे संरक्षण करते. हे त्वचेला ओलसर ठेवते आणि कोरडे होण्यापासून प्रतिबंधित करते. यामुळे त्वचेवर लवकर सुरकुत्या येत नाहीत आणि मुरुमदेखील होऊ शकत नाहीत.
त्वचा विकारांपासून बचाव : व्हिटॅमिन ‘एफ’मध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे संवेदनशील त्वचेसाठी उत्कृष्ट असतात. हे त्वचेचा ताण कमी करते आणि त्वचेवर डाग किंवा लाल डाग येण्यापासून बचाव करते. त्वचेचे रोग जसे की, सोरायसिस आणि एटोपिक डर्माटायटिस या रोगांवर याचे फायदे असतात.
सन्स्क्रीनसारखे कार्य : सूर्याच्या तीव्र किरणांमुळे त्वचेवर टॅनिंग किंवा सनबर्न होऊ शकते. हे टाळण्यासाठी व्हिटॅमिन ‘एफ’ समृद्ध आहार आणि व्हिटॅमिन ‘एफ’ असलेले लोशन लावणे महत्त्वाचे आहे. हे सन्स्क्रीनच्या साथीने वापरले तर त्वचेची अधिक चांगली सुरक्षा होते.
मेंदूचे आरोग्य : व्हिटॅमिन ‘एफ’ अल्झायमर्स आणि डिमेन्शिया यासारख्या मेंदूच्या रोगांचा धोका कमी करण्यासाठी मदत करते. यामुळे मानसिक आरोग्य सुधारते. कारण ते स्ट्रेस हार्मोन्स कमी करते, ज्यामुळे डिप्रेशन किंवा चिंता टाळता येते.
डोळ्यांचे आरोग्य : व्हिटॅमिन ‘एफ’ फक्त शरीराला आर्द्रतायुक्त ठेवत नाही, तर ते डोळ्यांना देखील कोरडे होण्यापासून वाचवते. हे रेटिनाच्या विकासास मदत करते आणि त्याची कार्यप्रणाली सुधरवते.
एएलए आणि एलए हे मुख्यतः वनस्पतीआधारित अन्नामध्ये आढळतात. बदाम, अक्रोड, हेजलनट्स, काजू, शेंगदाणे या नट्समध्ये, तसेच जवस, चिया सीड, सूर्यफूलाच्या बिया, जवसाचे तेल, सोयाबीन तेल, अक्रोडाचे तेल यामधून व्हिटॅमिन ‘एफ’ मिळते. याशिवाय सोयाबीन, टोफू, हिरव्या भाज्या, एवोकॅडो आणि किवीमध्ये देखील काही प्रमाणात व्हिटॅमिन ‘एफ’ असते. साल्मनसारखे फॅटी मासे तसेच अंड्यातूनही हे व्हिटॅमिन मिळते.