शरद पाटील : सत्यशोधकी प्राच्याविद्यापंडित!

2 hours ago 2

शरद पाटील यांच्या संशोधनाची पद्धत बहुप्रवाही असल्यामुळे ते मूलभूत संशोधन करून दडपल्या गेलेल्या इतिहासाची उकल करू शकले. त्यांचा आवाका जागतिक स्तरावरचा असल्यामुळे ते जागतिक तज्ज्ञ ठरतात. ते पारंपरिक किंवा पुस्तकी पंडित नव्हते; तर आदिवासी, कामगार, शेतकरी, महिला इत्यादींच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढणारे होते. त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने...

केवळ मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झालेले शरद पाटील (जन्म 17 सप्टेंबर 1925, मृत्यू 12 एप्रिल 2014) यांच्यावर सत्यशोधकी आणि वारकरी विचारांचा प्रभाव होता. ते महान संस्कृत पंडित होते. पारंपरिक मार्क्सवाद्यांच्या मतभेदाने ते सखोल संस्कृत अध्ययनाकडे वळले. वयाच्या 42 व्या वर्षी बडोद्याला जाऊन त्यांनी संस्कृतवर प्रभुत्व मिळवले. त्यांनी पाणिनी व्याकरण, वेद, महाकाव्ये, पुराण, उपनिषद, संस्कृत साहित्य मुळापासून वाचले. पाली, हिंदी, इंग्रजी इत्यादी भाषांवर त्यांचे कमालीचे प्रभुत्व होते. भारतीय आणि पाश्चिमात्य तत्त्वज्ञान त्यांनी अभ्यासले. ते केवळ पारंपरिक पुस्तकी संस्कृतपंडित नव्हते; तर इंडोलॉजी, पुरातत्त्वशास्त्र, स्त्रीवाद, राज्यशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, भाषाशास्त्र, मानवशास्त्र, मानसशास्त्र इत्यादी ज्ञानशाखांचे व्यासंगी अभ्यासक होते. त्याला मार्क्सवादाची जोड असल्यामुळे ऐतिहासिक भौतिकवाद ते मांडू शकले. ते संशोधनशास्त्र विकसित करू शकले. पण ते पारंपरिक मार्क्सवादी नव्हते. म्हणूनच ते मार्क्स कुठे चुकला, हे कॉ. बी. टी. रणदिवे यांना सप्रमाण सांगू शकले. मार्क्सचे चुकलेले गणित निदर्शनास आणून देणारा जगातला पहिला अभ्यासक म्हणजे शरद पाटील होत. ते मार्क्सवादी होते; पण ते मार्क्सचे अंधभक्त नव्हते. भारतीय समस्यांचे उत्तर युरोपीय तत्त्वज्ञानात नव्हे, तर भारतीय तत्त्वज्ञानातच त्यांनी शोधले. ते त्यांना प्राचीन स्त्रीसत्ताक व्यवस्था, महावीर, बुद्ध, महायानी तत्त्वज्ञांमध्ये सापडले. यामुळे शरद पाटील हे नवमार्क्सवादी ठरतात. भारतीय परिप्रेक्ष्यात मार्क्सला मर्यादा आहेत, हे ओळखून त्यांनी सांस्कृतिक लढा मांडला. त्यांनी मार्क्सवादाला फुले-आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाची जोड दिली. यालाच ‘माफुआ’ म्हणतात. त्यानंतर त्यांनी मार्क्सला बुद्धाच्या तत्त्वज्ञानाची जोड दिली. यालाच सौत्रांतिक मार्क्सवाद म्हणतात. भारतीय मार्क्सवादाला पारंपरिक विळख्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी नवे तत्त्वज्ञान आणि सत्यशोधक कम्युनिस्ट हा नवा राजकीय पक्षही दिला.

शरद पाटील यांचा आवाका अँटोनिओ ग्रामचीपेक्षा पुढचा होता. ते प्रतिमाप्रेमात अडकले नाहीत. त्यामुळे ते बुद्ध, शिवाजी महाराज ते डॉ. आंबेडकर मांडू शकले. त्यांच्या ज्ञानाचा परिप्रेक्ष्य जागतिक स्तरावरील होता. पण पाय कायम जमिनीवर होते. त्यांनी वैचारिक विरोधकांचाही कधी अनादर केला नाही. ते कर्मठ नव्हते. त्यामुळेच ते बहुप्रवाही अन्वेषण करू शकले. पण ते आपल्या मतांशी ठाम होते. त्यांना प्रतिवाद आवडायचा. पण तो अभ्यासू, दर्जेदार, सुसंस्कृत आणि निकोप असायला हवा, हे त्यांचे मत होते. शरद पाटील यांच्या संशोधनाची पद्धत एकप्रवाही नव्हती; तर ती बहुप्रवाही असल्यामुळे ते मूलभूत संशोधन करून दडपल्या गेलेल्या इतिहासाची उकल करू शकले. ते जाणीवनेणीव अन्वेषण पद्धतीचे जनक आहेत. त्यांनी सिग्मंड फ्राईडच्या पुढचा टप्पा गाठला. शरद पाटील हे इंडोलॉजीबरोबर मानसशास्त्र, तर्कशास्त्र इत्यादी ज्ञान शाखांचे अभ्यासक होते. गणिताची मदत घेण्यासाठी त्यांनी कुलगुरू डॉ. नानासाहेब ठाकरे, डॉ. के. बी. पाटील या गणितज्ञांची मदत घेतली. त्यांचा आवाका जागतिक स्तरावरचा असल्यामुळे ते जागतिक तज्ज्ञ ठरतात. ते पारंपरिक किंवा पुस्तकी पंडित नव्हते; तर आदिवासी, कामगार, शेतकरी, महिला इत्यादींच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून लढणारे होते आणि रात्री त्यांचा इतिहास लिहिणारे क्रांतिकारक इंडोलॉजिस्ट होते. त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात ते अग्रभागी होते. त्यासाठी त्यांनी तुरुंगवास भोगला. विद्वानांनी भूमिका घ्यायची नसते, रस्त्यावर उतरायचे नसते, या प्रतिमाप्रेमावर त्यांनी हातोडा मारला. धुळे येथील सन 2004 च्या शिवसन्मानाच्या मोर्चाचे त्यांनी नेतृत्व केले. शरद पाटील यांना कोणाचेही भक्त झालेले आवडत नव्हते. भक्त झालात तर विचार करायची क्षमता संपते. निःपक्षपाती भूमिका घेताना मर्यादा येतात. त्यामुळे नवनिर्मितीला अडथळा निर्माण होतो, असे त्यांचे ठाम मत होते. मार्क्सवादी, सौत्रांतिक मार्क्सवादी, अब्राह्मणी, बहुप्रवाही, जाणीवनेणीव द़ृष्टिकोनामुळे ते निऋती, आंबपाली, शूर्पणखा इत्यादींचा दडपलेला इतिहास मांडू शकले. जगात सुरुवातीला स्त्रीराज्ये होती. निऋती ही सप्तसिंधू खोर्‍यातील आद्य महाराणी होती, हे त्यांनी ‘दासशूद्राची गुलामगिरी’ या जगप्रसिद्ध ग्रंथात मांडले. हा त्यांचा अभिजात ग्रंथ आहे. आंबपाली ही वेश्या नसून ती वैशालीच्या (बिहार) स्त्रीराज्याची महाराणी होती, हे मांडून शरद पाटील यांनी महापंडित राहुल सांकृत्यायन यांचे खंडन केले. शूर्पणखा म्हणजे हाताच्या बोटाच्या सुंदर नखावरती लीलया सूप धरून धान्य पाकडणारी जनस्थान तथा नाशिक म्हणजे गोदावरी खोर्‍याची महाराणी होती, असे शरद पाटील ‘रामायण-महाभारतातील वर्णसंघर्ष’ या ग्रंथात मांडतात. यासाठी ते अभिजात संदर्भ देतात. महान प्राच्यविद्यापंडित डी. डी. कोसंबी, आर. एस. शर्मा, राहुल सांकृत्यायन, आर. जी. भांडारकर, डॉ. रोमिला थापर जेथे थांबतात, तेथून शरद पाटील सुरू होतात. दडपल्या गेलेल्या इतिहासाची त्यांनी उकल केली. ते म्हणायचे, सत्य लपवता येते; पण संपवता येत नाही. सत्य इतिहास असत्य इतिहासाबरोबर सावलीसारखा सोबत येत असतो. त्याची उकल त्यांनी बहुप्रवाही अन्वेषण पद्धतीने अनेक ज्ञानशाखांच्या आधारे केली. इतिहास संशोधनाच्या क्षेत्रातील अशक्य काम त्यांनी शक्य करून दाखवले. म्हणूनच शरद पाटील हे जागतिक स्तरावरचे प्राच्यविद्यापंडित ठरतात.

शरद पाटील यांनी निऋतीचा शोध लावला. त्यांनी तथागत गौतम बुद्धाचे, शिवरायांचे, संभाजीराजांचे क्रांतिकारक चरित्र लिहिले आहे. संभाजीराजांच्या सल्ल्यावरून शिवरायांनी दुसरा राज्याभिषेक केला, इतकी मोठी योग्यता आणि विद्वत्ता संभाजीराजांची होती, हे अन्वेषण शरद पाटील करू शकले. शरद पाटील यांनी इतिहासपूर्वकाळापासून ते प्राचीन, मध्ययुगीन ते आधुनिक इतिहासकाळापर्यंतचे विपुल आणि मूलभूत लेखन केलेले आहे. शरद पाटील यांनी गेल्या पाच हजार वर्षांचा बहुजनांच्या ज्ञानाचा बॅकलॉग भरून काढला, असे नामवंत विचारवंत आणि संत साहित्याचे महान भाष्यकार डॉ. सदानंद मोरे म्हणतात ते योग्यच आहे. त्यांनी बुद्ध सांगितला आणि ते बुद्ध जगले. भारतीय तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात झालेला संघर्ष त्यांनी ‘जातिव्यवस्थाक सामंती सेवक्तव’ या ग्रंथात मांडला. महायान पंथातील अश्वघोष, असंग, वसुबंधू, दिग्नाग, धर्मकीर्ती इत्यादी तत्त्ववेत्त्यांनी दिलेला वैचारिक लढा शरद पाटील यांनी प्रस्तुत ग्रंथात मांडला आहे. दिग्नाग, धर्मकर्तिी यांनी निर्माण केलेल्या सौंदर्यशास्त्राचे विस्तृत विवेचन शरद पाटील यांनी केले आहे. भारतात देखील सौंदर्यशास्त्र होते. त्याचा उगम स्त्रीराज्यात होता, हे प्रथमतः शरद पाटील यांनी मांडले. ते भारतीय कला, साहित्य आणि तत्त्वज्ञानाचे सौंदर्यशास्त्र मांडणारे पहिले दार्शनिक आहेत. त्यांचे मोठेपण जेवढे त्यांच्या विद्वत्तेत होते, तेवढेच त्यांच्या रोखठोक भूमिकेत होते. त्यांनी वेळच्या वेळी भूमिका घेतली. रिडल्स प्रकरणात त्यांनी भूमिका घेऊन डॉ. आंबेडकरांच्या पुष्ट्यर्थ वाल्मिकी रामायणातील पुरावे देऊन विरोधकांना पराभूत केले. त्यांचे साहित्य विचारशील, सृजनशील, निर्भीड, कृतिशील अभ्यासक तयार करते. त्यांचे साहित्य दीपस्तंभासारखे आहे. जन्मशताब्दी दिनानिमित्ताने त्यांना विनम्र आदरांजली!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article