सहकार चळवळीला नवी दिशा मिळावी, तसेच सभासद, ठेवीदार, कर्जदार यांच्या विश्वासावर गती मिळावी, यासाठी शिर्डी येथे 8 व 9 फेब्रुवारी 2025 या दोन दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेला सहकार मंत्री अमित शहा यांचीही उपस्थिती लाभणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकार उर्फ काका कोयटे यांनी दिली. दरम्यान, या परिषदेसाठी अमेरिका, थायलंड, इंडोनेशिया, श्रीलंका, फिलीपाईन्स, नेपाळ, मंगोलिया व कोरीया हे आठ देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेच्या पार्श्वभुमीवर नगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे कोयटे म्हणाले, आंतरराष्ट्रीय देशांची संघटना असलेल्या युनायटेड नेशन्स ऑर्गनायजेशन (युनो) ने 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार घोषित केलेले आहे. महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांची चळवळ ही जगातील सर्वात मोठी चळवळ आहे. या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे स्वागत तसेच या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात भरगच्च कार्यक्रम महाराष्ट्रात साजरे व्हावे, या दृष्टीने महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालक मंडळाच्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्यातील सर्वांत महत्त्वपूर्ण निर्णय 8 व 9 फेब्रुवारी 2025 रोजी सहकारी पतसंस्थांची आंतराष्ट्रीय परिषद महाराष्ट्रात संपन्न व्हावी, असा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या दिवशी 8 रोजी उद्घाटन होईल. त्यानंतर दुसर्या दिवशी 9 फेब्रुवारीला सहकाराचे खुले अधिवेशन संपन्न होणार आहे. सहकारी पतसंस्था चळवळीतील तज्ञांचे विविध विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित केली आहेत. यावेळी पतसंस्था चळवळीतील वासुदेव काळे, किसनराव लोटके आदींसह संस्थांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.