संस्कृती- को जागर्ति… कोण जागे आहे?

2 hours ago 1

>> गुरुनाथ तेंडुलकर

‘को जागर्ति? कोण जागं आहे?’ ज्या घरात लोक जागे असतात त्या घरात लक्ष्मी प्रवेश करते आणि त्या घरात नांदते. घरात श्रीलक्ष्मी नांदल्यामुळे साहजिकच कुटुंबाची भरभराट होते. म्हणून कोजागिरीच्या रात्री जागरण करण्याची पद्धत आणि परंपरा निर्माण झाली.  इथे जागं राहणं म्हणजे स्वतच्या उत्कर्षाच्या बाबतीत त्याचबरोबर समाजाच्या अभ्युदयासाठी जागृत राहणं.

आज सकाळीच माझ्या एका ग्रुपमधल्या मित्राचा फोन आला. ‘तेंडल्या, पुढच्या बुधवारी संध्याकाळी फ्री रहा. आपल्याला नाइट आऊटला जायचंय. आपला अख्खा ग्रुप तयार झालाय. तू नाही म्हणू नकोस. मागच्या वेळेला तू ऐन वेळी टांग दिली होतीस.’

‘ठीक आहे. बघतो.’ मी गुळमुळीत उत्तर दिलं आणि पुढे विचारलं, ‘पण बुधवारी नाइट आऊट कशाबद्दल रे?  काही खास?’

‘अरे बुधवारी कोजागरी आहे. रात्र जागवूया. धम्माल करूया.’

‘हो. पण कोजागिरीला रात्री फक्त मसाले दूध प्यायचं असतं ठाऊक आहे ना?’ मी थोडा मिश्किल आणि थोडा खोचक प्रश्न विचारला.

‘ठीक आहे रे. ज्यांना दूध प्यायचं ते दूध पितील आणि इतरांना जे जे हवं ते ते पिऊ दे. शेवटी काय तर आयुष्यात एन्जॉयमेंट महत्त्वाची. कोजागिरी हे फक्त एक निमित्त आहे रे.’ तो मित्र पुढेही बरंच काही बोलत राहिला.

मी ‘हूं…हूं…’ करीत सगळं ऐकून घेतलं. अलीकडे मी कुणाशीही वाद घालत नाही. कारण वाद घालून काहीच उपयोग होत नाही. हे मी आयुष्यातल्या अनेक अनुभवातून शिकलोय. त्यामुळे कुणाशीच वाद न घालतादेखील आपल्याला आपल्या मनासारखं वागण्याचं धोरण मी स्वीकारलंय. फोनवरचं आमचं बोलणं आटोपलं आणि त्या मित्राचे ते शब्द माझ्या कानात रुंजी घालत राहिले.

‘शेवटी काय तर आयुष्यात एन्जॉयमेंट महत्त्वाची. कोजागिरी हे फक्त एक निमित्त आहे रे.’

माझ्या मनात एक भलं मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं. कोजागिरीचं निमित्त साधून रात्र जागवायची. धम्माल करायची. एवढंच…?

वास्तविक ‘कोजागरी पौर्णिमा’ हा आपल्या सनातन भारतीय संस्कृतीमधला एक अविभाज्य सण आहे. या सणामागे काही कथा-कहाण्या जोडलेल्या आहेत. त्यातील एक कहाणी म्हणजे… समुद्रमंथनातून जी चौदा रत्नं निघाली त्यापैकी एक रत्न म्हणजे श्रीदेवी लक्ष्मी. ती भूतलावर प्रकट झाली तो दिवस म्हणजे अश्विन पौर्णिमा. म्हणूनच या दिवसाला ‘श्रीमहालक्ष्मीचा जन्मदिवस’ म्हणून मान्यता दिली आहे.

अद्यापही कृषीप्रधान असलेल्या आपल्या भारत देशात ग्रामीण भागात हा दिवस ‘नवान्न पौर्णिमा’ म्हणून साजरा केला जातो. शेतात नवीन पिकवलेल्या धान्याची पूजा करून त्याची विविध पक्वान्नं बनवली जातात. तांदळापासून खीर, गव्हापासून पुऱया बनवल्या जातात. नाचणी, ज्वारी-बाजरीच्या गोड भाकऱया बनवतात. विविध प्रकारच्या भाज्या आणि विविध प्रकारची पक्वान्नं बनवून लक्ष्मीनारायणाला नैवेद्य दाखवला जातो.

गुजरात, राजस्थानमध्ये या सणाला ‘शरद पूनम’ असं म्हणतात. त्या दिवशी राधाकृष्णाची पूजा करून रास-गरबा खेळला जातो. हिमाचल प्रदेशात तर या दिवशी ठिकठिकाणी जत्रा भरतात.

ओडिशामधे या पौर्णिमेला ‘कुमार पौर्णिमा’ असंही म्हणतात. त्या दिवशी हत्तीवर बसलेल्या गजलक्ष्मी देवीची पूजा करतात. तसंच प्रकाशाचं प्रतीक म्हणून दिवसा सूर्य आणि रात्री चंद्राचीही पूजा केली जाते. बंगालमध्ये कोजागिरीला विशेष महत्त्व आहे. त्याला बंगाली लोक ‘लोख्खी पूजो’ म्हणतात आणि संपूर्ण विश्वाचं पालन करणाऱया लक्ष्मीनारायणाची उपासना करतात. विविधतेमधे एकता ही आपल्या देशाची परंपराच आहे. विविध प्रांतात विविधप्रकारे साजरी होणारी ही शरद पौर्णिमा. पण या सर्व प्रांतातील एक समजूत मात्र समान आहे आणि ती म्हणजे…

मध्यरात्री श्री लक्ष्मीमाता घरोघरी जाऊन दारातून विचारते.

‘को जागर्ति? कोण जागं आहे?’

ज्या घरात लोक जागे असतात त्या घरात ती प्रवेश करते आणि त्या घरात नांदते. घरात श्रीलक्ष्मी नांदल्यामुळे साहजिकच कुटुंबाची भरभराट होते. म्हणून कोजागिरीच्या रात्री जागरण करण्याची पद्धत आणि परंपरा निर्माण झाली.

या समजुतीमागची शास्त्राrय कारणं समजून घेतली तर त्यात फार मोठा गहन-गूढ अर्थ दडलेला आहे. माता लक्ष्मी घरोघरी जाऊन दारात उभी राहून विचारते. ‘को जागर्ति? कोण जागं आहे? या प्रश्नामागचा अर्थ नीट समजून घ्यायचा असेल तर भगवद्गीतेतील दुसऱया अध्यायातील एकोणसत्तराव्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की,

या निशा सर्वभूतानां तस्या जागर्ति संयमी।

यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनैः।।

याचा भावार्थ असा, भौतिक लाभाकरिता आणि केवळ स्वतच्या मौजमजेकरिता सर्वच जागृत असतात. पण संयमी पुरुष मात्र अशा वेळी झोपलेला असतो. इथे झोपलेला असतो म्हणजे त्याला अशा प्रकारात फारशी रुची नसते. परंतु ज्याविषयी सर्वसामान्य माणसं झोपलेली असतात म्हणजेच जागरुक नसतात त्या विषयासंबंधी मुनी म्हणजेच ज्ञानी व्यक्ती सतत जागृत असतात.

लक्ष्मी माता विचारते, ‘को जागर्ति?’ म्हणजे कोण जागं आहे? इथे जागं राहणं म्हणजे स्वतच्या उत्कर्षाच्या बाबतीत त्याचबरोबर समाजाच्या अभ्युदयासाठी जागृत कोण आहे? असं ती विचारते. ज्या घरातील लोक खऱया अर्थाने जागृत असतात त्याच घराची भरभराट होते. लहानपणी घरोघरी दिवेलागणीला देवासमोर दिवा लावून शुभंकरोति… म्हणण्याची प्रथा होती. या श्लोकात आम्ही नेमकं काय म्हणायचो ते सांगतो.

शुभं करोति कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा ।

शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योती नमोस्तुते।।

हे प्रकाशाची देवता असणाऱया दिव्या, तुला आम्ही नमस्कार करतो. आमचं शुभ कर. कल्याण कर. आम्हाला आरोग्य आणि धनसंपदा लाभू दे. आमच्यातील शत्रुत्वाच्या बुद्धीचा म्हणजेच काम, ाढाsध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या सहाही शत्रूंचा विनाश होऊ दे…

संध्याकाळी तिन्हीसांजेच्या वेळेला घराघरातून स्तोत्रं म्हटली जायची. परवचा-पाढे म्हटले जायचे. माझे वडील तर माझ्याकडून दररोज एक संस्कृत श्लोक पाठ करून घ्यायचे. वयाची चाळिशी पन्नाशी ओलांडलेल्या आपल्यापैकी अनेकांनी हा अनुभव घेतला असेल. पण आता…

आता संध्याकाळच्या वेळेला तिन्हीसांज म्हटली जात नाही. तो असतो प्राइम टाइम. या प्राइम टाइममध्ये घराघरातून ज्या हिंदी-मराठी मालिका निरनिराळ्या

चॅनलवरून सुरू असतात त्यांचा लसावि (लघुत्तम साधारण विभाजक) काढला तर काय दिसतं…?

केवळ आणि केवळ शत्रुबुद्धी… सासू विरुद्ध सून, थोरल्या सुनेच्या विरोधात धाकटी सून, नणंद-भावजयीतील गृहकलह. एकमेकांवर केल्या जाणाऱया कुरघोडय़ा, कागाळ्या आणि कारस्थानं… ऑफिसमधे सुरू असणाऱया स्पर्धा जिंकण्यासाठी एकमेकांच्या विरोधात उघडलेले मोर्चे… पैशाची अफरातफर… गरीब घरातील सगळ्याच मुली बिचाऱया चांगल्या आणि श्रीमंत घरातील बायका-मुलींपैकी बहुतेक जण अहंकारी आणि हलकट वृत्तीचे. नायक-नायिकेच्या विरोधात रचले जाणारे कट. त्यांना दिला जाणारा शारीरिक आणि मानसिक त्रास. नायक-नायिकांमधे वितुष्ट निर्माण करण्यासाठी योजलेले प्रसंग आणि हे सगळं झगझगीत दाखवण्यासाठी घरातलं वातावरण… नायकापासून ते खलनायकांपर्यंत सगळेच जण अगदी लग्नाला जाताना घालतात तशा अप टु डेट पोशाखात.

मी कोणत्याही एका चॅनलचं नाव घेत नाही किंवा एका विशिष्ट सीरिअलबद्दल बोलत नाही. सध्या तिन्हीसांजेच्या वेळेला टीव्हीवाल्यांच्या भाषेत प्राइम टाइम म्हणतात. त्यावेळी दाखवल्या जाणाऱया सीरिअल तुम्ही स्वतच तपासून पहा. प्रेक्षकांमधली सात्त्विक वृत्ती संपवून परस्परांतील शत्रुबुद्धी वाढवण्यासाठी जणू विडाच उचललाय की काय असं वाटतं.

आजही तिन्हीसांजेच्या वेळेला श्रीमहालक्ष्मी प्रत्येकाच्या घराच्या दरवाजाशी थांबते. आत काय चाललंय याचा कानोसा घेते. डोकावून पाहते. तिला आतून जे आवाज ऐकू येतात, टीव्हीवर जी दृश्यं दिसतात ते पाहून तिला आत येण्याचा धीर होईल का?

श्री महालक्ष्मी माता केवळ कोजागिरीच्याच रात्री नव्हे तर दररोज तिन्हीसांजेला… आणि तिन्हीसांजेलाच नव्हे तर क्षणोक्षणी दरात उभी राहून विचारते, को जागर्ति? कोण जागं आहे का?

आतमधले लोक विशेषत गृहलष्म्या टीव्हीवरच्या वर्षानुवर्षं चालणाऱया चटकदार आणि कौटुंबिक कलहाच्या मालिका पाहण्यात दंग असतात. तरुण-तरुणी रात्रीच्या वेळी जाग्रणं करून ओटीटीवर अनेक वेबसीरिज बघतात. त्याशिवाय फेसबुकवर, इन्स्टाग्रामवर छोटे छोटे रील्स बघतात. त्याशिवाय टीव्हीवर चालणाऱया ािढकेटच्या बारमाही मॅचेस आहेतच. हे सगळं पाहताना तास न तास कसे निघून गेले हे कळतही नाही की जाणवतही नाही. या वेळात होऊ शकणारी महत्त्वाची कामंदेखील राहून जातात.  आपल्या मनावर दुसऱयाच कुणाचं तरी गारूड करून घेणं यालाच ‘मानसिक निद्रावस्था’ असं म्हटलं तर…? तर हे विधान चुकीचं ठरेल का? टीव्ही आणि मोबाइलपासून दूर राहून तेवढय़ा वेळात स्वतच्या आरोग्यासाठी व्यायाम, योगासनं केली तर…?  वाढलेलं वजन आणि कुरुकुरणारे गुडघे यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी एखाद्या नाचाच्या क्लासला गेलं तर…?  स्वतच्या मानसिक आरोग्यासाठी एखादा सकारात्मक छंद जोपासला तर…? ड्रॉइंग, पेंटिंग, गाणं, वाद्य वाजवणं यासारखी एखादी कला जोपासली तर…?  ज्ञानात भर पडण्यासाठी चांगल्या पुस्तकांचं वाचन केलं तर…?  एखादी नवीन भाषा शिकली तर…?  घरातील किंवा झालंच तर शेजारपाजारच्याही मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी काही विशेष प्रयत्न केले तर…?

आपल्या हाताशी भरपूर वेळ असतो. वाया घालवला जाणारा वेळ नीट वापरला तर खूप काही चांगलं करता येईल. घरात सुख-शांती, समृद्धी, आरोग्य आणि ऐश्वर्य नांदावंसं वाटत असेल तर त्या घरातील प्रत्येकाने स्वतच्या आणि कुटुंबियांच्या उत्कर्षासंबंधी जागृत राहायला हवं. यंदाच्या कोजागिरीपासून हे शुभसंकल्प चित्तात धारण करून अंमलात आणूया. स्वामी विवेकानंदांनी तमाम भारतवासीयांना कठोपनिषदातील दिलेला संदेश…

‘उत्तिष्ठत… जाग्रत… प्राप्य वरन्निबोधत…’

उठा. जागे व्हा. ज्ञानी व्यक्तींच्या संगतीत राहून आत्मोन्नतीचं ज्ञान प्राप्त करून घ्या.

[email protected] 

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article