Published on
:
07 Feb 2025, 12:50 am
Updated on
:
07 Feb 2025, 12:50 am
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या वतीने नेहरू नगर येथील मैदानावर क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. त्या स्पर्धेसाठी माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायकांनी सकाळी क्रिकेटच्या मैदानावर हजेरी लावली. सायंकाळी तोच वरिष्ठ सहायक लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकला. त्यामुळे सकाळी क्रिकेटच्या मैदानात अन् सायंकाळी एसीबीच्या जाळ्यात सापडल्याने सकाळी क्रिकेटची अन् सायंकाळी लाचेची चर्चा रंगली होती.
जिल्हा परिषेदेतील लाचखोरीची प्रकरणे गेल्या काही वर्षांपासून वाढत असल्याचे दिसत आहेत. गुरुवारी (दि. 6) सायंकाळी चारच्या सुमारास माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायक धनशाम म्हस्के हे 20 हजारांची लाच घेताना सापडले. या प्रकरणामुळे जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली होती.
माध्यमिक शाळेतील शिक्षकाच्या निवड श्रेणी प्रस्ताव प्रकरणी वरिष्ठ सहायक म्हस्केयांनी वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्यासाठी 40 हजारांची लाच मागितली होती. शेवटी 32 हजारांवर तडजोड झाली. त्यापैकी 20 हजार रुपये स्वीकारताना वरिष्ठ सहायकास लाचलुचपत विभागाने पकडले आहे. लाचलुचपतचे उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
वरिष्ठ सहायक यांनी वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्यासाठी शिक्षकाकडे लाच मागितली होती. ती देताना शिक्षकाने मायक्रो कॅमेर्याने शूटिंग घेतली. तसेच, ती शूटिंग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांना दाखविली. त्यानंतर लाचलुचपत विभागाचे अधिकारी हे तक्रारदारासोबत माध्यमिक शिक्षण विभागात येऊन वरिष्ठ सहायक म्हस्के यांना फाईल, लाचेसोबत घेऊन गेल्याची चर्चा माध्यमिक शिक्षण विभागाच्या कर्मचार्यांमध्ये रंगली होती.