सख्ख्या भावाचा खून; आरोपीला सात वर्षे सश्रम कारावासPudhari File Photo
Published on
:
18 Jan 2025, 1:24 am
Updated on
:
18 Jan 2025, 1:24 am
ओरोस / कणकवली : खारेपाटणनजीक कुरंगवणे- गोसावीवाडी येथील संतोष तुकाराम गिरी- गोसावी (40) याचा दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ भांडणातून त्याचाच सख्खा भाऊ आरोपी प्रकाश तुकाराम गिरी-गोसावी (63) याने डोक्यात आणि हनुवटीवर लोखंडी फुंकणी मारून खून केला होता. याप्रकरणी आरोपी प्रकाश गिरी-गोसावी याला सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली दोषी धरून जिल्हा सत्र न्यायाधीश 1 श्रीमती सानिका जोशी यांनी सात वर्षे सश्रम कारावास आणि 5 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी काम पाहिले.
ही घटना 21 एप्रिल 2022 रोजी रात्री 8.30 च्या सुमारास कुरंगवणे गोसावीवाडी येथे घडली होती. आरोपी प्रकाश हा मुलीसमवेत राहात असे. त्याच्या पत्नीचे 17 वर्षापूर्वी निधन झाले होते. तर मृत संतोष गिरी-गोसावी हा वेगळा राहत होता. त्याची पत्नी आणि चार मुले त्याच्यापासून वेगळी राहत होती. संतोषलाही दारूचे व्यसन होते. दोघांमध्ये वारंवार भांडणे होत असत. 21 एप्रिल 2022 रोजी ते त्यांच्या मुळ घरात असताना रात्री दोघांमध्ये जेवणावरून भांडण झाले. त्यावेळी प्रकाश हा दारू प्यायलेला होता तर संतोष दारू प्यायलेला नव्हता. दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली. त्यावेळी दारूच्या नशेत असलेल्या प्रकाश याने रागाच्याभरात त्याचा लहान भाऊ संतोष गिरी-गोसावी यास लोखंडी फुंकणीने डोक्यात व तोंडावर हनुवटीवर मारून गंभीर जखमी केले. त्यात संतोष याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कणकवली पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होवून त्याचा तपास कणकवलीचे तत्कालिन सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे यांनी केला होता. त्यांनी सादर केलेल्या दोषारोप पत्रानुसार चाललेल्या खटल्याच्या सुनावणीत सरकार पक्षातर्फे अतिरीक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी सर्व साक्षीदार तपासून युक्तीवाद केला. सुनावणी अंती जिल्हा सत्र न्यायाधिश 1 सानिका जोशी यांनी आरोपी प्रकाश तुकाराम गिरी-गोसावी याला सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली प्रत्यक्षदर्शी साक्ष व वैद्यकीय पुरावे तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानून सात वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली. केसच्या सुनावणीवेळी पैरवी पोलिस उपनिरीक्षक सूरज पाटील, पो.कॉ. अनिता कोळी आदींचे सहकार्य मिळाले.