मोठी बातमी समोर येत आहे, वांद्रे कौटुंबीक न्यायालयाने धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये द्यावेत असे आदेश दिले आहेत. आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचा दावा करुणा शर्मा यांनी केला होता. या प्रकरणातील सुनावणीदरम्यान न्यायालयानं हा आदेश दिला आहे. त्यानंतर आता न्यायालयात झालेला युक्तिवाद आणि न्यायालयाचा निकाल याबाबत धनंजय मुंडे यांचे वकील शार्दुल सिंग यांनी मोठा खुलासा केला आहे.
नेमकं काय म्हणाले वकील?
4 फेब्रुवारी रोजी हा अंतरिम निकाल आलेला आहे. युक्तिवाद गेल्या वर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये झाला होता. करुणा शर्मा नावाच्या महिलेनं धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध पिटीशन दाखल केलेली आहे. डोमेस्टिक व्हायलंस प्रमाणे ही याचिका दाखल करण्यात आली आहे. नियम असा आहे की, कुठलीही महिला कुठल्याही पुरुषाबरोबर राहिली असेल तर ती भविष्यात किंवा भूतकाळात आपल्या उदरनिर्वाहासाठी मेंटेनस पिटीशन दाखल करू शकते.
2022 मध्ये करुणा शर्मा यांनी मुंडे यांच्या विरोधामध्ये त्यांच्याकडे पैसे नाहीयेत, घर व बँकेचे ईएमआय भरण्यासाठी पैसे नाहीत असे वेगवेगळे आरोप करून पिटीशन दाखल केली होती. मात्र यात शारिरीक छळ केल्याचा कुठलाही आरोप लावलेला नव्हता. धनंजय मुंडे माझ्याबरोबर राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांनी मला पैसे द्यावे अशी ती पिटीशन होती. त्यांच्या केसमध्ये युक्तिवाद झाल्यानंतर अंतरिम आदेश म्हणजे जोपर्यंत केस संपत नाही तोपर्यंत उदरनिर्वाहसाठी किती पैसे द्यावे यावरून युक्तिवाद झाला. या प्रकरणात कोर्टानं असं सांगितल की करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये देण्यास हरकत नसावी. लिव्ह इन रिलेशनशिप मान्य केल्यानं हे आदेश देण्यात आले आहेत, त्याला आपण पोटगी म्हणू शकत नाही, असं वकिलांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना शार्दुल सिंग यांनी म्हटलं की, करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांच्या पत्नीचा दर्जा कुठल्याही कोर्टाने दिला नाही, त्या पहिल्या पत्नी ऑन रेकॉर्ड कुठेच नाहीत, त्यांच्याबरोबर कधी लग्नही झालेलं नाही. हायकोर्टात जो खटला धनंजय मुंडे ययांच्यावर दाखल केला होता त्या खटल्यासह इतर खटल्यात त्यांनी कुठेच असा क्लेम केलेला नाही. 25 पानाची कोर्टाची ऑर्डर आहे कुठल्याच लाईन मध्ये कोर्टाने पत्नी हा शब्द वापरला नाही वापरला असेल तर त्यांनी दाखवावा, कोर्टाने देखील असं काही सांगितलं नाही.