कोल्हापूर : पक्ष संघटन वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पक्षाचे जास्तीत जास्त सभासद करून जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवावी, असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले. सहकार विभाग एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न आहे. राज्य, जिल्हा बँक, सेवा सोसायटी असे पीक कर्जाचे वितरण होत असल्याने कर्जाचा व्याज दर वाढत आहे. यात सुधारणा करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
सहकार मंत्री झाल्यानंतर गुरुवारी प्रथमच कोल्हापूर दौर्यावर आले. राष्ट्रवादी (अजित पवार गट) काँग्रेस पक्षाच्या मार्केट यार्ड येथील कार्यालयात कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. पक्षाचे नवीन सुसज्ज कार्यालय उभारावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, सहकारामध्ये कोल्हापूरने राज्यात एक आदर्श निर्माण केला आहे. जिल्ह्यातील 1300 सेवा सोसायट्यांपैकी 500 हून अधिक सोसायट्या विविध व्यवसाय करून स्वयंपूर्ण झाल्या आहेत. हे कौतुकास्पद आहे. सहकारात खूप मोठे बदल होत असल्यामुळे सर्व सहकार क्षेत्र एकाच छताखाली आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दुधाच्या उत्पादनाला मर्यादा असल्यामुळे मागणीप्रमाणे आपण दूध पुरवठा करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच दूध भेसळीचे प्रकार वाढत आहेत. हे थांबविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. परंतु, भेसळयुक्त दुधाचा व्यवसाय म्हणजे स्वत:च्या पायावरच कुर्हाड मारून घेण्याचा प्रकार आहे, असेही मंत्री पाटील म्हणाले.
कोल्हापूरशी जवळचे नाते...
शिक्षण व कुस्तीचे धडे आपण कोल्हापुरातून घेतले असल्यामुळे या शहराशी माझे जवळचे नाते आहे. येथील सहकाराचा आदर्श घेऊन माझ्या जिल्ह्यात अनेक संस्था उभ्या करून चांगल्या चालवत आह, असे सांगत पाटील यांनी कोल्हापुरातील आठवणींना उजाळा दिला.
मुश्रीफ निवडून येतील, असं वाटलं नव्हतं...
कागल विधानसभा मतदारसंघाचा विचार करता हसन मुश्रीफ निवडून येतील, असे वाटत नव्हते. परंतु, सर्वसामान्यांना सोबत घेऊन त्यांनी केलेल्या मतदार संघाच्या विकासामुळे पुन्हा निवडून आले, असेही मंत्री पाटील म्हणले.