जत/संख : करजगी (ता. जत) येथे चार वर्षीय चिमुरडीचा शेजारीच राहणार्या 45 वर्षीय नराधमाने गळा दाबून खून केला. खुनापूर्वी त्याने या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याचा संशय आहे. पांडुरंग सोमनिंग कळ्ळी असे संशयित नराधमाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. खुनानंतर संशयित पांडुरंगने बालिकेचा मृतदेह पत्र्याच्या पेटीत लपवल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी कळ्ळी याला अटक केली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
घटनास्थळी पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक रितू खोखर यांनी भेट दिली. जातीय सलोखा अबाधित राहावा, यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गावात मोठा बंदोबस्त तैनात आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, करजगी येथे गावापासून जवळच वस्ती आहे. पीडित बालिका आजी व आजोबांसह येथे राहत होती, तर तिचे आई-वडील मोलमजुरीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात असतात. त्यांच्या घराशेजारीच संशयित पांडुरंग आईसोबत राहतो. गुरुवारी सकाळी साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास पीडित बालिका कळ्ळी याच्या घरासमोरील बदामाच्या झाडाखाली खेळण्यासाठी गेली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाली. तिच्या आजीने व नातेवाइकांनी आजूबाजूला शोधाशोध केली; पण ती सापडली नाही. गुरुवारी आठवडा बाजार असल्याने गावात दवंडीही देण्यात आली. सारा गाव मुलीचा शोध घेऊ लागला. शेवटी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बालिका हरवल्याची तक्रार उमदी पोलिसांना मिळाली.
उमदी पोलिसांनीही बालिकेचा शोध सुरू केला. ग्रामस्थांनी परिसरातील बंद घरे, विहिरी, अडगळीच्या ठिकाणी शोध घेतला. यादरम्यान बालिकेच्या आजीने पांडुरंगकडेही विचारणा केली, पण त्याने माहिती नसल्याचे सांगितले. संशय येऊ नये, म्हणून पांडुरंगनेही बालिकेचा शोध घण्याचा बहाणा केला.यादरम्यान, काही लोकांनी बालिकेला पांडुरंग याच्याबरोबर पाहिल्याचे पोलिसांना सांगितले. यावेळी पांडुरंग दारूच्या नशेत होता. जवळच असलेल्या पत्र्याच्या शेडजवळ तो संशयास्पद फिरत होता. पोलिसांनी त्या शेडचा दरवाजा उघडून पाहिले असता, संशय अधिकच बळावला. एका पत्र्याच्या पेटीत पीडित बालिकेचा मृतदेह गुंडाळून ठेवल्याचे दिसून आले.
उमदी पोलिसांचे प्रसंगावधान, समयसूचकता
उमदीचे सहायक निरीक्षक संदीप कांबळे यांनी बालिकेच्या अपहरणाचा संशय येताच घटनास्थळी धाव घेत यंत्रणा राबविल्याने वेळीच हा प्रकार उघडकीस आला. नराधम पांडुरंग कळ्ळी यानेच हे कृत्य केल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी तातडीने हालचाली करीत त्याला ताब्यात घेतले. बालिकेच्या शोधात असलेल्या जमावास आरोपीचे नाव समजण्यापूर्वीच त्याला पोलिस ठाण्यात आणले. बालिकेचा मृतदेहही ताब्यात घेतला. गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी घेतली.
पोलिस अधीक्षक संदीप घुगे घटनास्थळी; शांततेचे आवाहन
घटनेचे गांभीर्य ओळखून सायंकाळी पाच वाजता पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक रितू खोखर, उपअधीक्षक सुनील साळुंखे, जत पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळेकर, कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवशरण, उपनिरीक्षक जीवन कांबळे, सुनील व्हनखंडे, आगतराव मासाळ यांच्यासह सांगलीचे न्यायवैज्ञानिक शाखेचे सहायक निरीक्षक कोकाटे, काशिद यांच्यासह दंगल नियंत्रण पथक, सांगली मुख्यालयाकडील राखीव तुकडी, अतिरिक्त पोलिस तुकडी, याचबरोबर जत व उमदी पोलिस ठाण्यातील कर्मचार्यांचा बंदोबस्त घटनास्थळी व गावात तैनात आहे.
मिरज शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी
जत व उमदी येथील शासकीय रुग्णालयांतील शवविच्छेदन विभागाकडे महिला कर्मचारी नसल्याने बालिकेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. उत्तरीय तपासणीच्या अहवालानंतरच गुन्ह्याचे स्वरूप स्पष्ट होणार आहे.
संशयिताची पार्श्वभूमी वादग्रस्त
नराधम पांडुरंग याची पत्नी 20 वर्षांपूर्वीच माहेरी गेली आहे. तो आईबरोबर राहतो. आईबरोबरही भांडण झाल्याने तीही गुरुवारी घरी नव्हती. सकाळी बालिकेसोबत कोणी नसल्याचे पाहून नराधमाने हा प्रकार केल्याची चर्चा होती. पीडित बालिका घरासमोर आल्यानंतर पांडुरंगने खाऊ देऊन तिच्याशी खेळत असल्याचे भासवले. त्यानंतर शेडमध्ये नेऊन तिचा खून केला. तत्पूर्वी त्याने अत्याचार केल्याचा संशय आहे. अटकेनंतर नराधमाच्या चेहर्यावर गुन्ह्याचा लवलेशही नव्हता.
जत तालुक्यात सायंकाळी सहा वाजल्यानंतर समाजमाध्यमांद्वारे घटनेची माहिती वार्यासारखी पसरली. सर्वत्र निषेध व्यक्त करण्याबरोबरच, आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. निष्पाप बालिकेवर अत्याचार करून खून केलेल्या नराधमास फाशीची शिक्षा व्हावी, असे प्रतिसाद उमटत होते. त्याचबरोबर आज, शुक्रवारी जत शहर बंदची हाक दिली आहे.