सांगली : ड्रग्जचा कारखाना, ड्रग्ज व नशिल्या पदार्थांची तस्करी, विक्रीप्रकरणी रविवारी जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) सभेत आमदार भडकले. जिल्ह्यातील युवा पिढी ड्रग्ज, नशिल्या पदार्थांमुळे बरबाद होत असताना, अन्न -औषध प्रशासन आणि पोलिस प्रशासन दुर्लक्ष करीत आहे, त्यांच्यावर कडक कारवाई करा, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. ड्रग्ज व्यवसाय फोफावण्यास हे दोन्ही विभाग जबाबदार असल्याचा आरोप आमदार विश्वजित कदम, आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सुहास बाबर यांनी केला व अधिकार्यांना धारेवर धरले. दरम्यान, अधिकार्यांचा संयुक्त टास्क फोर्स नेमून ड्रग्ज, नशिल्या पदार्थांचे उत्पादन व विक्रीला पायबंद घाला, असे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची सभा झाली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील अध्यक्षस्थानी होते. खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार अरुण लाड, आमदार इद्रिस नायकवडी, आमदार सदाभाऊ खोत, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित देशमुख, आमदार सुहास बाबर, आमदार रोहित पाटील यांच्यासह पालक सचिव विनिदा वेद सिंगल, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलिस अधीक्षक संदीप घुगे उपस्थित होते.
अन्न-औषध प्रशासन काय तपासते?
आमदार कदम म्हणाले, सांगली जिल्ह्यात अनेक महिन्यांपासून अवैध धंदे सुरू आहेत. पण याकडे दुर्लक्ष होत आहे. विटा येथे ड्रग्ज तयार करण्याचा कारखाना सुरू होता, हा कारखाना नव्याने सुरू झालेला नाही. बेकायदेशीरपणे कारखाना सुरू राहिला, मात्र त्याची तपासणी केली जात नाही. अन्न-औषध प्रशासन नेमकी कशाची तपासणी करते. जिल्ह्यातील ड्रग्जसह नशेची औषधे तयार करणार्यांवर कारवाई का होत नाही? दुर्लक्ष करणार्यांवर कारवाई झाली पाहिजे.
‘ड्रग्ज’च्या मुळापर्यंत जावा
आमदार बाबर म्हणाले, विटा येथे अमली पदार्थ तयार करणारा कारखाना व साठा आढळल्याची बाब गंभीर आहे. आज अनेक तरुण मुले नशेच्या आहारी जात आहेत. राजरोस नशेची औषधे तयार केली जात आहेत. युवा पिढीचे भविष्य वाचविण्यासाठी याच्या तळापर्यंत जाऊन कारवाई झाली पाहिजे. हे रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याची गरज आहे.
‘ठाणेदार’ अधिकार्यांना हटवा
आमदार पडळकर म्हणाले, विटा शहरात ड्रग्ज तयार केले जात असल्याचे उघड झाले, या प्रकरणास पोलिस प्रशासन जबाबदार आहे. पोलिस यंत्रणेला याविषयी माहिती असताना कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. नशेखोरी रोखण्यासह पोलिस ठाण्यात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या पोलिस अधिकार्यांच्या तत्काळ बदल्या करण्यात याव्यात. आमदार अरुण लाड म्हणाले, जिल्ह्यात राजरोसपणे नशेची औषधे विकली जात आहेत. याला जबाबदार कोण?, त्यांच्यावर कारवाई का होत नाही? ड्रग्ज निर्मिती, तस्करीप्रकरणी आमदारांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. पालकमंत्री पाटील यांनीही हा प्रकार गांभीर्याने घेत टास्क फोर्स नेमण्याचे आदेश दिले.
अमली पदार्थ प्रतिबंधासाठी टास्क फोर्स स्थापन
अमली पदार्थ निर्मिती, वाहतूक, साठवणूक, विक्रीला प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, अन्न व औषध प्रशासन, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख यांचा टास्क फोर्स स्थापन करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. प्रत्येक आठवड्याला या टास्क फोर्सने केलेल्या कामकामाचा आढावा घेतला जाईल. तरुण पिढीला ड्रग्जपासून वाचवण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे. या तस्करीची पाळेमुळे खणून काढण्यात येतील, असा विश्वास पालकमंत्री पाटील यांनी दिला.