सांगलीजवळ चारचाकीच्या अपघातात धर्मगुरूचा मृत्यू झाला.
Published on
:
07 Feb 2025, 12:39 am
Updated on
:
07 Feb 2025, 12:39 am
सांगली ः सांगली - इस्लामपूर रस्त्यावरील लक्ष्मीफाट्याजवळ चारचाकी गाडीचे टायर अचानक फुटल्याने झालेल्या अपघातात इस्लामपूर येथील धर्मगुरूंचा जागीच मृत्यू झाला. हाफीज अलीम मन्सूर बारस्कर (वय 50, रा. इस्लामपूर) असे मृत धर्मगुरूंचे नाव आहे. या अपघातात तिघेजण जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास घडला.
हाजी अस्लम मिस्त्री (वय 62), समीर सरवर मुल्ला (50), फैयाज लियाकत इबुशी (52, सर्व रा. इस्लामपूर) अशी जखमींची नावे आहेत. यातील समीर मुल्ला यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी आहेत.
याबाबत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, अलीम बारस्कर व जखमी तिघे इस्लामपूर येथील आहेत. बारस्कर धर्मगुरू होते. गुरुवारी दुपारी चौघेजण सांगलीतील एका कुटुंबात भेटीसाठी इस्लामपूरहून चारचाकीने (एमएच 14, बीसी 6624) येत होते. लक्ष्मीफाट्याजवळ ते आले असता त्यांच्या मोटारीचे पुढील टायर फुटले. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी भरधाव वेगाने रस्त्याकडील विद्युत खांबावर जोरदार आदळली. त्यानंतर नव्या सिमेंटच्या रस्त्यावरून खड्ड्यात पलटी झाली. त्यात गाडीत पुढील सीटवर बसलेले हाफीज बारस्कर यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर समीर मुल्ला गंभीर जखमी झाले. यावेळी अस्लम मेस्त्री गाडी चालवित होते. त्यांच्याही पायाला दुखापत झाली आहे.
अपघातानंतर जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. फैयाज आणि अस्लम यांची प्रकृती स्थिर असून समीर यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अपघातस्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली होती. अपघातात बारस्कर यांचा मृत्यू झाल्याचे समजताच समाजबांधवांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती. उत्तरीय तपासणीनंतर सायंकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
टायर फुटून मोटारीवरील नियंत्रण सुटून ती रस्त्याकडेला असलेल्या विद्युत खांबावर जोरदार आदळली. यात विद्युत खांब वाकला. त्यानंतर मोटार खड्ड्यात पलटी झाली. अपघातातील बारस्कर यांचा जुन्या गाड्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता. ते धर्मगुरू असल्याने समाजातही त्यांना मोठा मान होता. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा, मुलगी असा परिवार आहे.