आतडे हा आपल्या पचनसंस्थेचा प्रमुख भाग आहे. सेवन केलेल्या आहाराचे पचन आणि अवशोषण हे आतड्यांमध्येच होत असते. त्यामुळे तंदुरूस्तीसाठी आतड्यांच्या समस्या आणि त्यांची ओळख करून घेणे अधिक गरजेचे आहे.
पौष्टिक आहार सेवन करावा हे खरे असले तरीही आरोग्य हे केवळ आपण किती पौष्टिक आहाराचे सेवन करतो त्यावर अवलंबून नाही तर शरीर तो आहार किती पचवू शकतो आणि त्यातील पोषक घटक किती प्रमाणात शोषून घेऊ शकतो यावर तंदुरुस्ती अवलंबून असते. आहार सेवन केल्यानंतर त्याचे पचन आणि शोषण करण्याचे कार्य लहान आतडे आणि मोठे आतडे यांच्यामध्ये होत असते. याच ठिकाणी पोषक घटकांचे शोषण होते. मोठ्या आतड्यामध्ये पाण्याचे शोषण होते आणि लहान आतड्यामध्ये खनिजे, जीवनसत्त्वे आणि इतर पोषक घटकांचे शोषण होते. आतडे आजारी पडल्यास आहार पचनावर प्रभाव पडतो असे नाही तर पोषक घटकांच्या शोषणावरही प्रभाव पडतो.
पचन संस्थेमध्ये चांगले जीवाणू मोठ्या आतड्यामध्ये आणि लहान आतड्याच्या मागील भागात असतात. अन्ननलिका, पोट आणि लहान आतडे याच्या पृष्ठभागी पाचक रस आणि एन्झाईम्स असल्यामुळे तिथे जीवाणू नसतात. उपयुक्त जीवाणू जगण्यासाठी आवश्यक असतात. ते एन्झाईम्स उत्पन्न करतात जे भोजन पचवण्यास मदत करतात. शरीरासाठी आवश्यक ‘बी’ जीवनसत्त्व आणि के जीवनसत्त्व यांची निर्मिती केली जाते ते हानीकारक जीवाणूंसमवेत लढतात. संसर्गापासून बचाव करतात आणि आतड्याच्या अंतत्वचेचे संरक्षण करतात. अतिताण, झोप पूर्ण न होणे, चरबी आणि शर्करेचे जास्त सेवन आणि जास्त प्रमाणात प्रतिजैविके यांचे सेवन केल्याने आतड्यांमधील चांगल्या जीवाणूंच्या संतुलनावर परिणाम होतो.
आतड्यांचे आरोग्य बिघडवणारे घटक
शरीराच्या गरजेपेक्षा अधिक आहार घेणे, रात्री जास्त आणि पचनाला जड आहार घेणे. सकाळी न्याहारी न करणे तसेच दोन जेवणांत खूप मोठे अंतर ठेवणे. जेवल्यानंतर खूप पातळ पदार्थांचे सेवन करणे. जास्त तळलेले, तेलकट आणि मसालेदार आहार करणे. शारीरिक सक्रियता कमी होणे. तणाव आणि अनिद्रा यामुळेही आतड्यांचे आरोग्य बिघडते. त्याशिवाय पचन तंत्र बिघडणे, अतिवजन किंवा खूप कमी वजन असणे, झोप न लागणे, सतत थकवा जाणवणे, त्वचेशी निगडीत समस्या निर्माण होणे, ऑटो इम्युन डिसॉर्डर म्हणजे शरीरच स्वतः चांगल्या पेशींचे नुकसान करते. काही विशेष पदार्थ पचण्यात त्रास होणे. आतड्यांच्या सामान्य कार्यात बाधा आल्यास त्याचा परिणाम हृदय, मेंदू, प्रतिकारक्षमता, त्वचा, वजन आणि शरीरातील हार्मोन्सच्या पातळीवरही पडू शकते. त्यामुळे आहारातील पोषक घटकांचे शोषणावरही परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे कर्करोगाचा विकास होऊ शकतो. आतडे खराब झाल्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढण्याचा धोका असतो.
आतड्यांचे आरोग्य असे राखा
अति तळलेले, तेलकट मसालेदार पदार्थ सेवन करणे टाळावे. तणावाचा पचन संस्थेवर खूप जास्त परिणाम होतो त्यामुळे तणाव टाळण्याचा प्रयत्न करावा. शारीरिक सक्रियता असावी आणि नियमितपणे व्यायाम आणि योग करावा. आहार सेवन करताना हळूहळू चावून जेवावे. दिवसभरात काही तासांनी थोडा थोडा आहार सेवन करावा. जेवल्यानंतर लगेच झोपू नये. थोडा वेळ फिरावे. त्यामुळे पचन योग्य रितीने होते. पोट फुगणार नाही. शरीराचे एक जैविक घड्याळ असते ते योग्य राखण्यासाठी ठराविक वेळी जेवण करावे. चहा कॉफी, जंक फूड आणि कार्बोनेटेड शीत पेये टाळून संतुलित आहार घ्यावा. धूम्रपान आणि दारू यांच्यापासून दूर रहावे. तंतुमय घटक असलेला आहार सामील करावा. प्रतिदिवस सकाळी एक ग्लास कोमट पाण्याचे सेवन जरूर करावे. सर्वांगासन, उत्तानपादासन, भुजंगासन सारखी योगासने आतड्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात.