जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका निवडणुकांचे वेध. Pudhari File Photo
Published on
:
25 Nov 2024, 11:43 pm
Updated on
:
25 Nov 2024, 11:43 pm
सातारा : विधानसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसला असून, आता जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका निवडणुकांचे वेध लागले आहेत. विधानसभेच्या आखाड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांनी साखर पेरणी पुन्हा सुरू केली आहे. त्यामुळे आता या निवडणुका जाहीर होण्याच्या प्रतीक्षेत असलेले हे इच्छुक आपापल्या परीने व्यूहरचना करताना दिसत आहेत.
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेल्या यशामुळे आता नवे कारभारी प्रशासकराज असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजवण्याच्या तयारीत आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून जिल्हा परिषद व पंचायत समित्यामध्ये प्रशासक राजवट आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये स्पष्ट कौल मिळाला असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तत्काळ घेण्यासंदर्भात खल सुरु झाला आहे.
स्थानिक पातळीवर पदाधिकारी नसल्यामुळे राजकीय पक्षांनादेखील कार्यकर्त्यांच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या निवडणुका तात्काळ घ्याव्यात, असा आग्रह पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधून होत आहे. प्रशासकीय राजवटीमध्ये स्थानिक स्वराज्य संंस्थांचा कारभार देखील मंत्री, आमदार, खासदार यांच्या हातामध्ये राहत आहे. सन 2025 मध्ये नवी जनगणना होणार आहे. या जनगणनेला बराच अवधी लागणार आहे. नव्या जनगणनेची लोकसंख्या निश्चित झाल्यावर गट, गण आणि प्रभागरचना करुन निवडणूक घेण्यास लागणारा कालावधी विचारात घेता निवडणुका लांबणीवर पडतील. म्हणून 2011 च्या जनगणनेप्रमाणे अस्तित्वात असलेली प्रभागरचना, त्यामध्ये थोडा बदल करुन निवडणुका घेता येतील त्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाकडून चाचणी करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यात नुकतीच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी झाली. यामध्ये सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून राज्यात ओळख होती. मात्र या बालेकिल्ल्याची विधानसभा निवडणुकीत चांगलीच धुळधाण झाली. जिल्ह्यात महायुती सरस ठरली आहे. भाजपाचे 4, शिवसेना 2 व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 2 असे आमदार निवडून आले. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलणार आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा करिष्मा पहावयास मिळेल. जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीतच इच्छुकांनी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणामध्ये साखर पेरणी केली आहे. इच्छुकांनी आपापल्या भागातून विधानसभा निवडणुकीत चांगले मताधिक्क दिले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीकडे इंच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे.
झेडपी, पंचायत समित्यामधील बलाबल
जिल्हा परिषद सदस्य 64
राष्ट्रवादी काँग्रेस 41, राष्ट्रीय काँग्रेस 7, भाजपा 6, शिवसेना 2, सातारा विकास आघाडी 3, कराड विकास आघाडी 3, पाटण विकास आघाडी 1
जिल्ह्यात पंचायत समित्या 11 : सदस्य : 128
पं.स. सदस्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस 76, राष्ट्रीय काँग्रेस 16, भाजपा 10, शिवसेना 7, सातारा विकास आघाडी 7, पाटण विकास आघाडी 2, कराड विकास आघाडी 7,
रासप 1, अपक्ष 2
(मागील निवडणुका होऊन जवळपास 8 वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. या कालावधीत बर्याच राजकीय उलथापालथीही झाल्या आहेत. त्यामुळे मागील निवडणुकीतील संख्याबळाला राजकीयदृष्ट्या फारसे महत्त्व उरलेले नाही.)