जगातील सर्वात शक्तिशाली देशाच्या अध्यक्षपदाची सूत्रे डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा स्वीकारल्यापासून निर्णयांचा धडाकाच सुरू केला आहे. बरे, हे तमाम निर्णय केवळ त्यांच्या देशापुरते मर्यादित असते तर जागतिक समुदायाने वा इतर देशांनी त्यात नाक खुपसण्याचे कारण नव्हते, पण ट्रम्प यांच्या निर्णयांचे पडसाद म्हणा वा दुष्परिणाम जेव्हा जागतिक पातळीवर उमटायला लागले तेव्हा हिंदुस्थानसह जगभरातील सारेच देश ट्रम्प यांच्या दुसऱ्या राजवटीकडे संशयाने बघू लागले आहेत. ट्रम्प राजवटीचे चटके असेच सुरू राहिले तर महासत्तेविरुद्ध आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी मोर्चेबांधणी होऊ शकते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दुसरा कार्यकाळ सुरू झाला आहे व पहिल्या कारकीर्दीपेक्षा त्यांची दुसरी कारकीर्द अंमळ अधिकच वादग्रस्त ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. ट्रम्प यांनी पहिलाच निर्णय घेतला तो अमेरिकेत अवैधरीत्या स्थलांतरित झालेल्या विदेशी नागरिकांविरुद्ध. या निर्णयाचा सर्वात मोठा फटका अमेरिकेत अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हिंदुस्थानी नागरिकांना बसला आहे व ट्रम्प आणि मोदी यांच्या गळापडू मैत्रीवर स्तुतीसुमने उधळणारा अमेरिकेतील मोठा हिंदुस्थानी वर्ग ट्रम्प यांचे हे नवे रूप पाहून मनातून हादरला आहे. ट्रम्प आणि मोदी यांच्या जिगरी दोस्तान्यावर अगाढ श्रद्धा असणारा हा वर्ग स्थलांतरितांना अमेरिकेबाहेर हाकलण्याच्या निर्णयातून मोदी नक्कीच काहीतरी मार्ग काढतील, असा विश्वास बाळगून होता. मात्र ट्रम्प यांनी आपल्या शपथविधी सोहळय़ास जिथे मोदी यांनाच निमंत्रित केले नाही, तिथे आपली काय डाळ शिजणार, या भयाने अमेरिकेत स्थलांतरित झालेले हजारो हिंदुस्थानी नागरिक आता हवालदिल झाले आहेत. कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता न करता जे लोक अमेरिकेत स्थलांतरित झाले आहेत, त्यांना शोधून त्यांची अमेरिकेतून हकालपट्टी करण्याची घोषणाच ट्रम्प यांनी केली आहे. केवळ घोषणा करूनच ते थांबले नाहीत, तर ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर लगेचच संपूर्ण अमेरिकेत अवैध स्थलांतरितांना शोधण्यासाठी धाडसत्र सुरू झाले. गेल्या 11 दिवसांत तब्बल 25 हजारांहून अधिक अवैध स्थलांतरितांना अमेरिकन प्रशासनाने ताब्यात घेतले आहे. इमिग्रेशन आणि कस्टम विभागाच्या पथकांनी अमेरिकेतील 12 राज्यांमध्ये छापे घालून मोठ्या प्रमाणावर
बिगरअमेरिकी लोकांची धरपकड
सुरू केली आहे. या कारवाईत अमेरिकन प्रशासनाने तब्बल 1700 अवैध स्थलांतरित हिंदुस्थानींना बेड्या ठोकल्याचे सांगण्यात येते. यात धक्कादायक गोष्ट अशी की, हद्दपारीसाठी अमेरिकन प्रशासनाने जी यादी तयार केली आहे, त्यात तब्बल 18 हजार हिंदुस्थानी व्यक्तींची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. कित्येक वर्षांपूर्वी नोकरी, व्यापार, व्यवसाय व चरितार्थासाठी अमेरिकेत जाऊन तिथेच स्थायिक झालेल्या हजारो अनिवासी हिंदुस्थानींवर या निर्णयाची कुऱ्हाड कोसळणार आहे. आजघडीला अमेरिकेत सुमारे 54 लाख हिंदुस्थानी नागरिक वास्तव्यास आहेत. अमेरिकन लोकसंख्येच्या तुलनेत हिंदुस्थानी वंशीयांचे प्रमाण 1.47 टक्का इतके आहे. यातील दोन तृतीयांश लोक हे पहिल्या पिढीतच अमेरिकेत राहावयास गेले. बाकी सर्व जन्माने अमेरिकी बनले. तथापि, अमेरिकेच्या नव्या निर्णयानुसार अमेरिकेत जन्मलेल्या प्रत्येक बाळास आता अमेरिकेचे नागरिकत्व मिळेलच असे नाही. नागरिकत्व देण्यापूर्वी त्या कुटुंबाची संपूर्ण पार्श्वभूमी व कायदेशीर कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. आई-वडील दोघेही वैधरीत्या अमेरिकेचे नागरिक असतील तरच त्यांच्या अपत्यास अमेरिकेचे नागरिकत्व बहाल केले जाणार आहे. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने किंवा करीअरसाठी अमेरिकेत जाणाऱ्या तरुण वर्गाला या निर्णयाचा मोठा फटका बसणार आहे. एच-1 बी व्हिसाधारकांवर या कायद्यामुळे नेमका किती प्रभाव पडेल, ते भविष्यात स्पष्ट होईल. मात्र
ट्रम्प प्रशासनाच्या
निर्णयामुळे अमेरिकेतील तरुण नोकरदार वर्ग आणि त्यांचे हिंदुस्थानातील पालक नक्कीच धास्तावले आहेत. केवळ हिंदुस्थानच नव्हे, ज्या-ज्या देशांतील लोक अवैधपणे अमेरिकेत घुसखोर म्हणून दाखल झाले; त्या सगळय़ांनाच बाहेरचा रस्ता दाखवणार असल्याचे ट्रम्प यांनी आपल्या निवडणूक प्रचारातच जाहीर केले होते. ‘अमेरिका फर्स्ट’ अर्थात अमेरिकेचे हित सर्वोपरी हीच ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराची मुख्य टॅगलाइन होती व अमेरिकेत बेकायदा वास्तव्य करणाऱ्यांना यत्किंचितही स्थान असणार नाही, असे त्यांनी आपल्या भाषणांत निक्षून सांगितले होते. त्याच घोषणेची कठोर अंमलबजावणी ट्रम्प यांनी सुरू केली आहे. हिंदुस्थानबरोबरच मेक्सिको व इतर शेजारी देशांतून येणाऱ्या स्थलांतरितांवरही ट्रम्प यांनी कारवाई सुरू केली आहे. त्यापाठोपाठ चीन, कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशांवर 25 व 10 टक्के आयात शुल्क लादण्याचा निर्णय ट्रम्प यांनी जाहीर केला. त्यामुळे जगभरातील साऱ्याच शेअर बाजारांत मोठी घसरण झाली. जगातील सर्वात शक्तिशाली देशाच्या अध्यक्षपदाची सूत्रे डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा स्वीकारल्यापासून निर्णयांचा धडाकाच सुरू केला आहे. बरे, हे तमाम निर्णय केवळ त्यांच्या देशापुरते मर्यादित असते, तर जागतिक समुदायाने वा इतर देशांनी त्यात नाक खुपसण्याचे कारण नव्हते, पण ट्रम्प यांच्या निर्णयांचे पडसाद म्हणा वा दुष्परिणाम जेव्हा जागतिक पातळीवर उमटायला लागले तेव्हा हिंदुस्थानसह जगभरातील सारेच देश ट्रम्प यांच्या दुसऱ्या राजवटीकडे संशयाने बघू लागले आहेत. ट्रम्प राजवटीचे चटके असेच सुरू राहिले तर महासत्तेविरुद्ध आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी मोर्चेबांधणी होऊ शकते.