सासवडचा चेहरामोहरा बदलणार; विजय शिवतारे यांची ग्वाहीPudhari
Published on
:
24 Jan 2025, 9:57 am
Updated on
:
24 Jan 2025, 9:57 am
सासवड: सासवड शहर येणार्या कालावधीत अत्यंत महत्त्वाचे शहर म्हणून उदयास येणार आहे. पुरंदर तालुक्यात होत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग, रिंग रोड, आंतरराष्ट्रीय विमानतळ यासारख्या प्रकल्पांमुळे शहराला अनन्यसाधारण महत्त्व येणार आहे. त्यामुळे शहराच्या विकासासाठी रस्ते, गटार, वीज आणि उद्याने अशा सर्व सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न मी करणार असल्याची ग्वाही आमदार विजय शिवतारे यांनी दिली आहे.
सासवड (ता. पुरंदर) येथे नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आ. शिवतारे यांनी ही माहिती दिली. या वेळी सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, नगरसेवक सचिन भोंगळे, माजी उपनगराध्यक्ष दीपक टकले, माजी उपनगराध्यक्ष वामन जगताप, संजय ज्ञा. जगताप, विद्या टिळेकर, अस्मिता रणपिसे, माजी नगरसेवक राजेश दळवी, शहरप्रमुख मिलिंद इनामके, कुंडलिक जगताप, मंदार गिरमे, राजू शिंदे, धनंजय म्हेत्रे, संदीप मु. जगताप, मंगेश भिंताडे, अतुल जगताप, प्रकाश जगताप, ओंकार जगताप, अविनाश बडदे आदी उपस्थित होते.
या वेळी शिवतारे यांनी सासवड शहरासाठी मंजूर केलेली 143 कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश दिले. सासवड शहरात कार्डीयाक रुग्णवाहिका आणि शववाहिनी नाही, अद्ययावत अग्निशमन यंत्रणा नाही, ती उभारण्यासाठी निधीची तरतूद करणार आहे.
सासवड शहरातील सर्व रस्ते सुधारण्यासाठी राज्य सरकारच्या नगरोत्थान योजनेतून 156 कोटी रुपयांचा निधी मागितला असून त्यासाठी देखील मी पाठपुरावा करणार आहे, असेही शिवतारे म्हणाले. सासवड शहरातील उद्याने बंद असल्याची बाब काही नागरिकांनी शिवतारे यांच्या निदर्शनास आणून दिली.
ही उद्याने नागरिकांसाठी खुली करावीत. त्यासाठी काही आर्थिक अडचणी असल्यास निधीची मागणी करावी, तो उपलब्ध करून दिला जाईल अशा सूचना शिवतारे यांनी केल्या. याशिवाय सासवड नगरपालिकेने सौर उर्जा प्रकल्प उभारला असला तरी तो रोहित्र नसल्याने कार्यान्वित करण्यात आलेला नाही. जिल्हा नियोजन समितीकडून रोहित्रासाठी निधी मागणी करावी, असे या वेळी आमदार शिवतारे यांनी सूचित केले.