Published on
:
06 Feb 2025, 12:34 am
Updated on
:
06 Feb 2025, 12:34 am
कोल्हापूर ः पुण्यात गुलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) चे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. राज्यातअनेक ठिकाणी या आजाराचे रुग्ण आढळू लागले आहेत. हा आजार तसा जुनाच असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. जिल्ह्यात सन 2023 मध्ये 20 रुग्ण तर 2024 मध्ये 38 असे दोन वर्षांत एकूण 58 जीबीएसचे रुग्ण सापडले आहेत. यात 21 बालकांचा समावेश असून त्यांच्यावर सीपीआर येथे यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. जीबीएसमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
गेल्या चार ते पाच वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यात जीबीएसचे रुग्ण सापडू लागले आहेत. हा आजार दुर्मीळ आणि जीवघेणा आहे. आजारात हाता-पायाच्या संवेदना कमी होऊन थेट श्वसन संस्था निकामी होऊ शकते. मात्र, वेळेत उपचार घेतल्यास आजाराला हरवणे सोपे आहे. हे सीपीआरच्या वैद्यकीय पथकांसह रुग्णांनी दाखवून दिले आहे. खासगी रुग्णालयातील या आजाराचा खर्च मोठा आहे. त्यामुळेच रुग्णांसह नातेवाईकांना या आजारापेक्षा खर्चाची भीती अधिक वाटते. मात्र, सीपीआर येथे या आजारावर दोन वर्षांत 58 जणांवर मोफत उपचार केले असून आता पूर्वीप्रमाणे त्यांचा दिनक्रम सुरू आहे.
जीबीएस रुग्णाला इम्युनोग्लोबिन इंजेक्शन दिली जातात. आतापर्यंत सीपीआरमध्ये उपचार झालेले रुग्ण पूर्णतः बरे झाले आहेत. येथे उपचार पूर्णतः मोफत आहेत. नागरिकांनी या आजारी लक्षणे दिसताच त्वरीत रुग्णालयात दाखल व्हावे.
डॉ. शिशिर मिरगुंडे, सीपीआर, वैद्यकीय अधीक्षक