लांजा : महावितरण उपविभाग उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देताना शिवसेना (उबाठा)चे उपजिल्हाप्रमुख दत्ता कदम, लांजा तालुका अध्यक्ष सुरेश करंबेळे, विश्वास मांडवकर, युवराज हांदे, अभिजित राजेशिर्के, संदीप सावंत, मोहन तोडकरी.pudhari photo
Published on
:
07 Feb 2025, 12:55 am
Updated on
:
07 Feb 2025, 12:55 am
लांजा : महावितरण विभागाकडून संपूर्ण लांजा तालुक्यामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू असून याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गुरुवारी 6 फेब्रुवारी रोजी तीव्र विरोध करत निषेध दर्शविण्यात आला. तसे पत्र महावितरण लांजाचे उपकार्यकारी अभियंता महावितरण उपविभाग लांजा यांना देण्यात आले.
महावितरण विभागानकडून लांजा तालुक्यात स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. या प्रक्रियेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कडाडून विरोध केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने उपकार्यकारी अभियंता महावितरण उपविभाग लांजा यांना दिलेल्या निवेदन म्हटले आहे की, महावितरण विभागाकडून संपूर्ण तालुक्यामध्ये स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. याला आमचा तीव्र विरोध असून बसविण्यात येणार्या स्मार्ट मीटरमुळे वेळोवेळी रिचार्ज करणे, त्याची देखभाल व दुरुस्ती करणे या गोष्टी ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसाला तसेच शेतकरी वर्गाला शक्य होणार नाही.
अनेक गावांमध्ये आजही इंटरनेटची सुविधा नसल्याने स्मार्ट मीटर रिचार्ज करणे शक्य होणार नाही. त्यामुळे स्मार्ट मीटर बसवण्यात ग्रामीण भागातील जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. ज्या पद्धतीने स्मार्ट मीटर बसवण्यासाठी महावितरण विभागाकडून जोर-जबरदस्ती केली जात आहे, हा प्रकार निषेधार्य असून स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया त्वरित थांबवावी. तसेच संपूर्ण तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने स्मार्ट मीटर बसवण्यासाठी जो प्रयत्न सुरू आहे, त्या मनमानी कारभाराचा लांजा तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे.
स्मार्ट मीटर बसवण्याची प्रकिया त्वरित न थांबवल्यास पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये घटक पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. लांजा महावितरण लांजाचे उप कार्यकारी अभियंता महावितरण उपविभाग यांना निवेदन देताना उपजिल्हाप्रमुख दत्ता कदम, तालुका प्रमुख सुरेश कंरबळे, विभाग प्रमूख युवराज हांदे, उपविभागप्रमुख विश्वास मांडवकर, सुभाष तावडे, मोहन तोडकरी, पप्पू मुळ्ये, अभिजित राजेशिर्के, सरपंच संघटना अध्यक्ष संदीप सावंत, भाई राईन, अंकुश गुरव, व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.