Published on
:
01 Feb 2025, 12:40 am
Updated on
:
01 Feb 2025, 12:40 am
कोल्हापूर : शहराच्या विकासासाठी हद्दवाढ होणे आवश्यक आहे; परंतु याला दोन बाजू आहेत. त्यामुळे शहराच्या हद्दवाढीबाबत सर्वांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी शासकीय विश्रामधाम येथे माध्यमांशी बोलताना सांगितले. यासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न महापालिका स्थापन होण्यापूर्वीपासूनचा आहे. ग्रामीण भागातून रोज साधारणपणे दीड ते दोन लाख नागरिकांची शहरात ये-जा सुरू असते. सर्व प्रमुख शासकीय कार्यालये, शिक्षण संस्था कोल्हापूर शहरात आहेत. त्यामुळे शहराची हद्दवाढ आवश्यक आहे. कोल्हापूरनंतर स्थापन झालेल्या महापालिकांची हद्दवाढ झाली; परंतु कोल्हापूर शहराची महापालिका स्थापन झाल्यापासून एक इंचही हद्द वाढली नाही. शहराच्या विकासासाठी हद्दवाढीची चर्चा सुरू झाल्यानंतर त्याला ग्रामीण भागातील नागरिकांनी विरोध सुरू केला आहे. शहराची हद्दवाढ व्हावी, असे शहरवासीयांचे म्हणणे आहे, तर हद्दवाढीला ग्रामपंचायतींचा विरोध आहे. हद्दवाढीवरून शहरी आणि ग्रामीण जसे दोन गट आहेत, तसेच आमदार, मंत्री यांच्यामध्येदेखील दोन गट आहेत. यातील काहीजणांना हद्दवाढ हवी आहे, तर काहींचा त्यास विरोध आहे. आतापर्यंत अनेकवेळा हद्दवाढीबाबत सुधारित प्रस्ताव पाठविले आहेत.
यासंदर्भात बोलताना पालकमंत्री आबिटकर म्हणाले, हद्दवाढीसाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नदेखील सुरू आहेत. महापालिकेच्या वतीने प्रस्तावही पाठविले; परंतु हद्दवाढीच्या प्रश्नावरून दोन मतप्रवाह आहेत. शहरवासीयांना हद्दवाढ हवी आहे. मात्र, शहरालगत असणार्या गावांचा हद्दवाढीला विरोध असल्याने हद्दवाढीशी संबंधित असणार्या या सर्व घटकांशी प्रथम चर्चा करावी लागते. त्यामुळे हद्दवाढीसह शहरातील विविध प्रश्नांवर पुढील आठवड्यात आयुक्तांसमवेत बैठक घेण्यात येईल.
शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. शहराच्या विकासासाठी हद्दवाढ आवश्यकच असल्याने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.
- प्रकाश आबिटकर, पालकमंत्री