Published on
:
07 Feb 2025, 12:45 am
Updated on
:
07 Feb 2025, 12:45 am
चिपळूण शहर : कोकणातील प्रामुख्याने चिपळूणमध्ये पारंपरिक हातपाटी व्यवसायाला शासनाने तातडीने परवाने द्यावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जन आंदोलन केले जाईल, असा इशारा माजी आमदार रमेश कदम यांनी आज 6 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिला आहे. पत्रकार परिषदेला पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव, तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, शहर अध्यक्ष रतन पवार, माजी नगराध्यक्ष अजमल पटेल उपस्थित होते.
या संदर्भात माहिती देताना कदम म्हणाले की, मध्यंतराी हातपाटीला परवाने देण्याच्या निविदा निघाल्या. मात्र, ड्रेझरच्या माध्यमातून वाळू उत्खननास परवानगी नसल्याने हा विषय जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आला. त्याबाबतचा जिल्हाधिकार्यांनी शासनाकडे अहवाल पाठवून मार्गदर्शन मागविले. मात्र, मुळातच हातपाटी वाळू व्यवसाय परवान्यांची निविदा काढलेली असताना व ड्रेझरद्वारे उत्खननाची निविदा नसतानादेखील केवळ हातपाटी वाळू व्यावसायिकांवर अन्याय करण्यासाठी परवाने दिले गेले नाहीत.
आता नव्याने सरकार स्थापन झाले आहे. मंत्रिमंडळात याबाबत लवकरात लवकर धोरणात्मक निर्णय व्हावा आणि हातपाटी वाळू व्यावसायिकांना न्याय मिळावा. तसेच वाळूशी संबंधित व्यवसायांना पुन्हा एकदा उभारी मिळावी, यासाठी लवकरच संबंधित मंत्र्यांची शिष्टमंडळाद्वारे भेट घेणार आहोत. निर्णय न झाल्यास आम्ही जनआंदोलन करू, असा इशारा कदम यांनी यावेळी दिला.
वाळू नसल्याने बाजारपेठेवरही परिणाम
वाळू नसल्यामुळे शासकीय विकासकामे थांबली आहेत. त्याचबरोबर खासगी बांधकामे देखील ठप्प आहेत. एखाद्या नागरिकाला त्याचे मोडकळीस आलेले जुने घर नव्याने उभारायचे असल्यास वाळूअभावी त्याला ते काम करता येत नाही. एकूणच वाळू उपलब्ध होत नसल्यामुळे संपूर्ण बाजारपेठेतील आर्थिक व्यवहार कमी झाले आहेत.