हिंगोली जिल्ह्यात दुपारच्या सत्रात मतदानाचा टक्का वाढला:दुपारी एक वाजेपर्यंत 35.97 टक्के मतदान, ग्रामीण भागात मतदानासाठी गर्दी
3 days ago
2
हिंगोली जिल्हयात दुपारच्या सत्रात मतदानाचा टक्का चांगलाच वाढला असून दुपारी एक वाजेपर्यंत ३५.९७ टक्के मतदान झाले होेेते. यामध्ये सर्वात जास्त ३८.४० टक्के मतदान कळमनुरी विधानसभा मतदार संघात झाले आहे. हिंगोली जिल्हयातील हिंगोली, कळमनुरी व वसमत विधानसभा मतदार संघात आज सकाळी सात वाजल्या पासून मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्हयात मतदान सुरु करण्यापुर्वी झालेल्या मॉकपोलमध्ये २१ ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाला. त्यामुळे काही ठिकाणी नवीन मतदान यंत्र वापरून मतदान सुरु करण्यात आले. हिंगोली शहरासह जिल्ह्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.४६ टक्के मतदान झाले होते. यामध्ये शहरी भागात नागरीकांची मोठी गर्दी झाली होती. त्या तुलनेत ग्रामीण भागातून मतदान केंद्रावर तुरळक प्रमाणात गर्दी होती. मात्र सकाळी नऊ वाजल्यानंतर हळूहळू गर्दीला सुरवात झाली. सकाळी ११ वाजेपर्यंत १९.२० टक्के मतदान झाले होते. सकाळी नऊ ते आकरा वाजण्याच्या कालावाधीत १४.७४ टक्के मतदान वाढले होते. मात्र सकाळी आकरा वाजल्यानंतर ते दुपारी एक वाजेपर्यंत मतदानाच्या तिसऱ्या सत्रात ग्रामीण भागातील मतदान केंद्रावरही मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातून मतदान झाले. हिंगोली जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सपत्नीक मतदान केले. तर उमेदवारांनी आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. दरम्यान, दुपारी एक वाजता ३५.९७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वात जास्त ३८.४० टक्के मतदान कळमनुरी विधानसभा मतदार संघात झाले असून त्या पाठोपाठ वसमत विधानसभा मतदार संघात ३५.१५ टक्के तर हिंगोली विधानसभा मतदार संघात ३४.३६ टक्के मतदान झाले आहे. ग्रामीण भागातून मतदारांचा ओघ कायम असून यावेळी मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)