Published on
:
24 Jan 2025, 12:06 am
Updated on
:
24 Jan 2025, 12:06 am
न्यूयॉर्क : भविष्यातील वाहने अतिशय वेगवान असतील यात शंकाच नाही. त्यामध्ये मोटारी किंवा रेल्वेचाच नव्हे तर विमानांचाही समावेश आहे. ‘बूम सुपरसोनिक’ कंपनीच्या ‘एक्सबी-1’ या विमानाची नुकतीच अकरावी यशस्वी चाचणी घेण्यात आली. भविष्यात हे प्रवासी विमान ध्वनीच्या वेगालाही मागे टाकेल अशी त्याची क्षमता आहे. या विमानाने चाचणीवेळी ताशी 1,172 किलोमीटरचा वेग गाठला. हा वेग ध्वनीच्या वेगाच्या जवळपास असलेल्या ‘माच 0.95’ इतका आहे.
ही चाचणी आकाशात 29,481 फूट उंचीवर झाली. दहावी चाचणी यापेक्षाही अधिक उंचीवर घेण्यात आली होती व त्यावेळीही विमानाने इतका वेग गाठला होता. इतक्या उंचीवर हवेचा दाबही कमी असतो. मात्र आता त्यापेक्षा कमी उंचीवरही विमानाने इतका वेग गाठला आहे. हाय डायनॅमिक एअर प्रेशरमध्येही 383 नॉटस् इक्विव्हॅलंट एअरस्पीड गाठणे हे मोठेच यश मानले जाते. अर्थात ज्यावेळी हे विमान प्रत्यक्ष सेवेत येईल त्यावेळी त्याला इतकी कठीण परीक्षा द्यावी लागणार नाही. त्यावेळी ते अधिक उंचीवर उड्डाण करीत ध्वनीचा वेग पार करील. त्या उंचीवर हवा विरळ असते व त्यामुळे विमानाला होणारा हवेचा अडथळाही कमी असतो. आता हे विमान ध्वनीच्या वेगाच्या थोडेसे खाली ठेवलेले आहे. मात्र ते ध्वनीच्या वेगाला पार करीत असतानाही योग्य प्रकारे नियंत्रणात असेल याची आता खात्री झालेली आहे. 2025 च्या प्रारंभीच हे ‘एक्सबी-1’ विमान ‘माच 1’ स्पीड गाठेल व आपले ध्येय साध्य करील, असे कंपनीने यापूर्वीच म्हटले आहे. आपल्या बाराव्या चाचणीवेळी हे विमान असे उद्दिष्ट गाठेल अशी अपेक्षा आहे.