८७ वर्षांच्या आईचा वापर राजकारणासाठी होतो हे दुर्दैवी: श्रीनिवास पवारFile Photo
Published on
:
19 Nov 2024, 9:50 am
Updated on
:
19 Nov 2024, 9:50 am
Baramati News: माझी आई आता ८७ वर्षाची आहे. तिला सभेला आणणे कितपत योग्य होते, हे मला समजत नाही. तिथे वाचलेले पत्र तिनेच लिहिले असावे का याबद्दल मी साशंक आहे. कारण मी सुद्धा तिचाच मुलगा आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू व मविआचे उमेदवार युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांनी व्यक्त केले.
शरयू मोटर्समध्ये निवडणूक आयोगाने सर्च ऑपरेशन राबविले, याबाबत त्यांना विचारणा केली असता ते म्हणाले, रात्री इथे फक्त सुरक्षारक्षक असताना पाच-सहा अधिकारी आले. त्यांनी तपासणी केली. सुरक्षारक्षक व्हीडिओ चित्रीकरण करू लागला तेव्हा त्याला रोखले. आमच्या वकीलांनी मंगळवारी निवडणूक आदिकाऱ्यांकडे चौकशी केली, तेव्हा त्यांनी तक्रारीच्या अनुषंगाने तपासणी झाल्याचे सांगितले. पण तक्रार कोणाची होती, हे सांगितले नाही.
यासंबंधी आम्हाला काही कल्पना नव्हती. इथे आम्ही व्यवसाय करतो. त्याचा रितसर कर भरला जातो. नटराज कलादालनाचीही तपासणी झाल्याचे निदर्शनास आणून दिले असता, शरयू मोटर्स हे उमेदवाराशी संबंधित आहे, नटराज उमेदवाराशी संबंधित नाही, असे ते म्हणाले. ठिक आहे, भाजपची ती नितीच आहे, पण आम्ही काही चुकीचे केलेले नाही, त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही, असे ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रचार सांगता सभेत आई आशाताई यांना आणण्यात आले. त्यांच्या वतीने पत्र वाचन करण्यात आले, यासंबंधी श्रीनिवास पवार म्हणाले, आई सध्या ८७ वर्षाची आहे. तिचा राजकारणासाठी वापर होतो याचे मला वाईट वाटते. ती त्यांची आई आहे तशी माझीही आई आहे.
आईनेच ते पत्र लिहिले का याबद्दल मला शंका आहे. आम्हाला कधी २०-२५ वर्षात पत्र लिहिले नाही. ते तिने लिहिले असेल का, असा सवाल त्यांनी केला. तिच्या आजाराबाबत अजित पवार यांनी सभेत माहिती दिली. तिची ट्रिटमेंट सुरु आहे. ती थांबवून तिला आठ दिवसांसाठी इथे आणले गेले. ठिक आहे, तिला ते २५ तारखेनंतर पुन्हा ट्रिटमेंटसाठी नेतील.
मी तर अशा परिस्थितीत तिला असा आग्रह केला नसता. मी तिला भेटलो होतो तेव्हा ती मला म्हणाली की मी दमलीय रे, कंटाळली आहे या आजारपणाला. मला दोन पावले सुद्धा चालता येत नाहीत. तुला सभेला नेतील अशी विचारणाही मी केली होती, पण मी हलू शकणार नाही, असे ती म्हणाली होती. पण सोमवारच्या सभेत ती दिसल्याने मला आश्चर्य वाटले. सहाजिकच या वयात व्यक्ति परावलंबी असतो, तुम्ही बाकीचे समजून घ्या असे ते म्हणाले.
अजित पवारांसोबत असलेल्या बहिणींबाबत ते म्हणाले, माझे आणि मोठ्या बहिणीचे काही बोलणे झालेले नाही. आमची मोठी बहिण दादाचा व्यवसाय बघते. दादाच्या केसेस चालल्या आहेत, त्या ती बघते.
बारामतीच्या निवडणूकीबाबत ते म्हणाले, लोकसभेला जे झाले तेच परत करण्याची मतदारांची इच्छा दिसते आहे. बारामतीकर शरद पवारांनाच मानतात. मध्यंतरी २०-२५ वर्षे त्यांनी इतरांकडे सोपवली होती. बारामतीकर शरद पवार यांना निराश करणार नाहीत.
महिलांना पैसे देवून आणल्याचा अजित पवार यांच्या आरोपांवर ते म्हणाले, त्यांच्या सभेला कोण लोक होते हे पत्रकार म्हणून तुम्हाला माहित आहे. मी तर लोकसभेपासून या प्रवाहात आलो आहे. ते जुने खिलाडी आहेत.
शरयू मोटर्समधील तपासणीबाबत मविआचे उमेदवार युगेंद्र पवार म्हणाले, सोमवारी रात्री तिथे पथक आले होते. तिथे आमचा व्यवसाय आहे. तिथे त्यांना काही मिळाले नाही. आम्ही कायदा पाळणारे लोक आहोत. तक्रार कोणी केली याची माहिती नाही. जोपर्यंत सगळी माहिती मिळत नाही तोपर्यंत याबाबत बोलणं योग्य नाही. पण आम्ही कायद्याने या गोष्टीला सामोरे जाण्यास तयार आहोत.