>> प्रवीण अमरे
पप्पू गेला. मराठी पत्रकारितेतला एक अष्टपैलू लेखक गेला. माझ्यासाठी कुटुंबातला एक सदस्यच गेला. एक परममित्र गेला. नेहमीच क्रिकेटपटूंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा पप्पू म्हणजेच द्वारकानाथ संझगिरी मी मुंबईचा एक क्रिकेटपटू असल्यामुळे माझ्या मागेही उभा राहिला आणि त्याने माझ्यावर केलेल्या अप्रतिम लिखाणामुळे मी रेल्वेकडून खेळत असतानाही मुंबईकरांना माझा खेळ कळला. माझा खेळ वाचता आला, जो मला माझ्या कसोटी कारकीर्दीसाठी फायदेशीर ठरला.
मी मुंबई संघासाठी दोन मोसम खेळल्यानंतर 1988 साली रेल्वेच्या सेवेत रुजू झालो. त्यामुळे मला रेल्वेसोबत खेळण्यासाठी दिल्ली गाठावी लागली. रेल्वेत गेल्यामुळे मी मुंबई क्रिकेटसाठी दुरावलो होतो, पण पप्पूने मला दूर जाऊ दिले नाही. मी जेव्हा जेव्हा रेल्वेसाठी शतके ठोकली तेव्हा तेव्हा पप्पूने माझ्यावर लेख लिहून माझ्या खेळाची सर्वांना दखल घ्यायला भाग पाडले. मी रेल्वेकडूनही जोरदार खेळतोय हे मुंबईकरांना पप्पूमुळेच कळले. तेव्हा ना इंटरनेट होते, ना सोशल मीडिया. तरीही पप्पूने आपल्या ओघवत्या शैलीत माझा खेळ मुंबईकर आणि क्रिकेटच्या दिग्गजांपर्यंत पोहोचवला. याचाच मला माझ्या कारकीर्दीत खूप फायदा झाला आणि माझा रणजीपटू ते कसोटीपटूपर्यंतचा प्रवास अधिक वेगवान झाला.
माझे हिंदुस्थानी संघात पदार्पण झाले तेव्हा पप्पूच्या चेहऱयावर प्रचंड आनंद होता. कारण मुंबई सोडून रेल्वेत सामील झाल्यानंतर हिंदुस्थानी संघात पदार्पण करणे किती कठीण असते याची कल्पना पप्पूला होती. पप्पूच्या रूपात मला एक मित्र तर भेटलाच, पण त्यांनी मला विजय लोकापल्लीसारखा आणखी एक मित्रही दिला. पुढे मी मुंबईच्या क्रिकेट संघाचा प्रशिक्षक झालो तेव्हाही पप्पू माझ्यासोबत होता.
पप्पू अष्टपैलू होता. तो नेहमी क्रिकेटच्या गप्पा मारायचा, किस्से सांगायचा असे नाही. त्याचे संगीताचे ज्ञान, सिनेमाचे ज्ञानही अफाट होते. तो भरभरून बोलायचा. तो बोलायचा तेव्हा आम्ही फक्त श्रोत्याच्या भूमिकेत असायचो. तो क्रिकेटच नव्हे, तर संगीताचा सुवर्णकाळ असा जिवंत करायचा की, जणू आम्हीही त्याच काळातले आहोत. क्रिकेटबरोबर संगीत आणि सिनेमावर लिहिणारा मी दुसरा कोणताही लेखक पाहिलेला नाही. त्यांचे लेखांचे जितके फॅन होते तितकेच त्यांच्या म्युझिक इव्हेंट्सचेसुद्धा फॅन होते. मीसुद्धा त्याचा फॅन होतो. त्याच्या अनेक कार्यक्रमांना मी त्याच्याकडून इतिहास ऐकण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलोय. तो क्रिकेटच नव्हे, तर संगीत आणि सिनेमाचा चालताबोलता गुगलबाबा होता. मी स्वतःला भाग्यशाली मानतो की, पप्पूच्या क्रिकेट, संगीत, सिनेमावरील प्रेमाला जवळून पाहिलेय. भावी पिढी पप्पूसारख्या अष्टपैलूला मुकली याचे दुःख वाटतेय. पण मीसुद्धा माझा एक परममित्र पत्रकार गमावलाय. त्यांची उणीव मला आयुष्यभर जाणवणार.
‘झीरो फॉर फाइव्ह’ची प्रेरणा पप्पूचीच
मुंबईचा प्रशिक्षक झाल्यानंतर 2006 च्या पहिल्याच मोसमात मुंबई सलग तीन सामने हरली होती. त्यानंतर मुंबईच्या संघाने मुसंडी मारली. उपांत्य फेरीच्या लढतीत जेव्हा मुंबईची 5 बाद 0 अशी केविलवाणी अवस्था होती त्या सामन्यात मुंबईने कमबॅकही केले आणि रणजी जेतेपदही पटकावले. त्या विजयानंतर पप्पू मला पार्कात भेटल्यावर नेहमीच म्हणायचा की, तू जे काही केले आहेस ते भन्नाट आहे. मुंबई ज्या स्थितीतून रणजी विजेता झाला याची भावी पिढीला माहिती मिळायला हवी. त्यासाठी तू पुस्तक लिही, असे माझ्या मागे लागला होता. त्याची प्रेरणा घेऊनच मी माझ्या आत्मचरित्राची सुरुवात केली आणि त्याचे नावही ‘झीरो फॉर फाइव्ह’ ठेवले.