नेर (Ner accident) : पिंपरी इजारा येथे रानडुकराच्या अचानक झालेल्या धडकेत दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर तिचे पती गंभीर जखमी झाले. रविवारी सायंकाळी सुमारे पाच वाजताच्या सुमारास हा हृदयद्रावक प्रकार घडला. शहरातील झाडीपुरा येथील लता दीपक ठाकरे (वय 45) या आपल्या शेतातून दोघे पती-पत्नी दुचाकी क्रमांक (MH 29 BW 9787) घरी नेर येथे परतत होत्या.
पिंपरी गावाजवळील स्मशानभूमीजवळ अचानक समोर रानडुक्कर आडवे आल्याने दुचाकीवरील ताबा सुटला आणि गाडी घसरली. यात लता ठाकरे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. तातडीने त्यांना नेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पतीलाही दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या (Ner accident) घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. लता ठाकरे यांच्या पश्चात पती, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. गावकऱ्यांनी वनविभागाने रानडुकरांच्या वाढत्या संख्येवर त्वरित नियंत्रण ठेवावे, अशी मागणी केली आहे.