Parbhani :- परभणी शहरातील वर्दळीच्या व अत्यंत महत्त्वाचा रस्ता असलेल्या गणपती चौक ते विद्यानगर या रस्त्यावर प्रचंड मोठे मोठे खड्डे पडून वाहन चालवणे तर सोडाच परंतु पायी चालणे सुद्धा अवघड बनले होते. अखेर या रस्त्याचे भाग्य उजळले; गणपती चौक ते विद्यानगर रस्ता, डांबरीकरणाला सुरूवात झाली असून या ठिकाणाहून वाहनधारकांना आता चांगल्या प्रकारचा रस्ता मिळेल. मोठ्या थाटामाटात गेल्या पावसाळ्याच्या (Rainy season)तोंडावर गणपती चौक ते विद्यानगर या रस्त्याचे व नाली बांधकामांचे भूमिपूजन करण्यात आले होते.
अखेर या रस्त्याचे भाग्य उजळले…
रस्त्याच्या कामाला सुरुवात होऊन रस्ता मजबुती करण्यासाठीचे आवश्यक ते कार्य पूर्ण करण्यात आले परंतु कुठे माशी शिंकली माहिती नाही. डांबरीकरण पावसाळा उलटून गेला तरी झालेच नाही. बघता बघता डिसेंबर संपून नवीन वर्ष २०२५ उजडले.तर दुसरीकडे मजबुतीकरण केलेल्या रस्त्याला मोठे मोठे खड्डे पडलेले होते. गणपती चौकाच्या वळणावर तर वाहन चालवणे सोडाच पण पायी चालणे सुद्धा वर्दळीच्या वेळी अवघड होऊन बसले होते.प्रशासन व जनतेत प्रचंड लोकप्रिय असलेल्या लोकप्रतिनिधींनी यांनी या रस्त्याच्या डांबरीकरणाकडे अखेर आता लक्ष दिले असून या रस्त्यावरील खड्ड्यांची आता डागडूजी केली जात असून डांबरीकरणाचे काम सुद्धा दोन दिवसापासून सुरू झाले आहे. आता तरी या रस्त्याचे काम मजबूत व्हावे व संबंधितांनी या रस्त्याच्या कामाकडे विशेष लक्ष द्यावे अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.