परभणी (Parbhani) :- इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांना मोफत प्रवेश मिळावा, यासाठी आरटीई अंतर्गत पालकांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज केले असून, केवळ १,३८१ जागांसाठी तब्बल ३,६२५ अर्ज दाखल झाले आहेत. उपलब्ध जागांपेक्षा जवळपास तिप्पट अर्ज आल्याने प्रवेश लॉटरी पद्धतीने दिले जाणार आहेत.
१ हजार ३८१ जागांसाठी ३ हजार ६२५ अर्ज
आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खाजगी इंग्रजी शाळांमध्ये सुद्धा शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी शासनाने विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद केली. मात्र अर्ज अधिक असून उपलब्ध जागा मर्यादित असल्याने अनेक पालकांचे आपल्या पाल्यास इंग्रजी शाळेत (English School) शिकण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही असे चित्र आहे. जिल्हा परिषद (Zilla Parishad) शाळांमधील पायाभूत सुविधांची दुरवस्था, शिक्षकांच्या कमतरता आणि मराठी शाळांकडे कमी होत चाललेला ओढा यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी होणारी स्पर्धा दिवसेंदिवस तीव्र होत आहे. शासकीय शाळांमध्ये शिक्षकांचे प्रमाण अपुरे असून, अनेक ठिकाणी अद्यापही ‘गुत्ता पद्धती’ने एका शिक्षकाकडून संपूर्ण वर्ग शिकवला जात आहे. अशा परिस्थितीत खाजगी शाळा मधून तरी मुलांना चांगले शिक्षण मिळावे या उद्देशाने आरटीई अंतर्गत मिळणार्या मोफत प्रवेशासाठी पालकांची झुंबड उडत आहे.
प्रवेशक्षमतेपेक्षा जास्त अर्ज आल्याने पात्र विद्यार्थ्यांची निवड लॉटरीद्वारे होणार
आरटीई अंतर्गत मिळणार्या प्रवेशांमुळे अनेक गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना चांगल्या शाळांमध्ये मुलांचे शिक्षण घेण्याची संधी मिळत आहे. मात्र, प्रवेशक्षमतेपेक्षा जास्त अर्ज आल्याने पात्र विद्यार्थ्यांची निवड लॉटरीद्वारे होणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या यादीसह प्रतीक्षा यादी लवकरच जाहीर करण्यात येईल. निवड झालेल्यांनी आवश्यक कागदपत्रे समितीकडे सादर करावी लागतील. मराठी शाळांच्या दर्जात सुधारणा झाली, तर इंग्रजी शाळांकडे वाढता कल कमी होत जाईल, असे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
इंग्रजी शिक्षणाकडे पालकांचा वाढता कल
शासकीय मराठी शाळांची झालेली दुरवस्था, शिक्षकांच्या कमतरता आणि इंग्रजी शिक्षणाकडे वाढती मागणी यामुळे पालक मोठ्या संख्येने इंग्रजी शाळांकडे वळत आहेत. आरटीईमुळे आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना चांगल्या शाळांमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी दरवर्षी मोठा संख्येने अर्ज दखल होत आहेत.
तालुका निहाय जागा व अर्जसंख्या
परभणी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये आरटीई अंतर्गत एकूण १,३८१ जागा उपलब्ध असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज आले आहेत.
परभणी शहर: २९९ जागा – ५९१ अर्ज
परभणी तालुका: २९३ जागा – १,०१४ अर्ज
गंगाखेड: १४१ जागा – ३७९ अर्ज
जिंतूर: १०५ जागा – २७९ अर्ज
मानवत: ६५ जागा – ११० अर्ज
पालम: ५७ जागा – १०५ अर्ज
पाथरी: २९ जागा – १०४ अर्ज
पूर्णा: ९३ जागा – २६७ अर्ज
सेलू: १३८ जागा – ४९८ अर्ज
सोनपेठ: १६२ जागा – २७३ अर्ज