संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज आणि शिव व्याख्याते असलेले शिरिष मोरे यांनी आत्महत्या केली. वीस दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा झाला होता मात्र लग्न होण्याआधीच कर्जापायी आयुष्य संपवत असल्याचं मिळालेल्या पत्रांमधून समोर येत आहे.
प्रसिद्ध शिव व्याख्याते आणि संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरिष मोरे महाराजांच्या आत्महत्येनं देहू पंचक्रोशीमध्ये शोककळा पसरली आहे. वीस दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा झाला होता. मात्र कर्जाचा डोंगर अंगावर असल्याचं म्हणत त्यांनी आत्महत्ये आधी पाच चिठ्ठ्या लिहिल्या आणि गळफास घेत आयुष्य संपवलं. मम्मी, पप्पा आणि दीदी यांना लिहिलेल्या पत्रामध्ये शिरिष मोरेनी असं म्हटलं आहे की, आयुष्यात जे जे करायचं म्हटलं त्यापाठिशी तुम्ही उभे राहिलात जे मिळवण्यासाठी अनेक वर्ष लागतात ते तुमच्या पाठिंब्याने काही वर्षातच मिळालं. आयुष्यात तुम्हाला कधीच माझ्यामुळे मान खाली घालावी लागली नाही. मला घडवलं पाठिशी तुम्ही उभे राहिलात. पण आता मी तुमच्यासोबत उभं राहणं गरजेचं असतानाच सोडून जातोय. कधी-कधी सर्व जिंकूनही माणूस हरतो. मी थांबतोय. यात सर्वस्वी दोष माझाच आहे. मला माफ करा.
आपल्या चार मित्रांना लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलंय, खरंतर युद्धातून पळ काढणाऱ्यांना मदत मागणं चुकीचं पण कृपया करून आई-वडिलांना सांभाळा. दीदीचं चांगलं स्थळ पाहून लग्न लावून द्या. डोक्यावर खूप कर्ज झालंय त्याची सगळी यादी देतोय. गाडी विकूनही काही कर्ज राहील. त्यात तुम्ही सर्वांनी मदत करून आई-वडिलांना जपा. मी हे कर्ज सहज फेडू शकलो असतो असं वाटत असेल पण आता ताकद नाही लढण्याची. माफ करा आणि आम्हाची नवऱ्याबाई तिचं आयुष्य उद्ध्वस्त करून चाललोय. खूप गोड आहे प्रियंका तिला वेळेत देता आला नाही. तिच्यासाठी चांगला मुलगा बघा नाहीतर ती लग्न करणार नाही. हात जोडून माफी मागतो. आई-वडील, होणारी पत्नी आणि मित्रांच्या नावावर अशा पाच चिठ्ठ्या मोरे यांनी लिहिले आहेत. तुकाराम महाराजांचा काळ लोटून शेकडो वर्ष झाली असली तरी आजही त्यांचे अभंग अनेकांसाठी संजीवनी आहेत. सुखा-सुखीचा सारा प्रपंच उद्ध्वस्त होऊनही बरे झाले तेव्हा निघाले दिवाळी असं म्हणणाऱ्या तुकाराम महाराजांच्या एका वंशजानं प्रपंचाच्या आव्हानांपुढे आत्महत्येचा मार्ग निवडावा हे देखील मोठं दुर्दैव आहे.
Published on: Feb 06, 2025 11:20 AM