दारव्हा(Yawatmal):- स्थानिक शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींना राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी (Volleyball tournament) निवड होऊनही त्या या महत्त्वाच्या स्पर्धेत सहभागी होऊ शकल्या नाहीत. पालकांनी मुख्याध्यापक आणि क्रीडा शिक्षकांवर हलगर्जीपणाचा आरोप केला असून त्यांच्या विरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे.
श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील प्रकार
सविस्तर असे की,इयत्ता १२ वी विज्ञान शाखेच्या कु. प्राजक्ता प्रशांत गोरे आणि कु. वेदांती सचिन निमकर यांची १५ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२४ दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली होती. मात्र, स्पर्धेच्या नियोजित तारखानंतरही त्या या स्पर्धेत सहभागी होऊ शकल्या नाहीत. पालकांच्या म्हणण्यानुसार, मुख्याध्यापक श्री.दिलीप पवार आणि क्रीडा शिक्षक श्री. संजय पवार यांनी सुरुवातीपासूनच या प्रकरणात अडथळे निर्माण केले. दि. १३ ऑक्टोबर २०२४ रोजी पालकांनी क्रीडाशिक्षक संजय पवार यांची भेट घेतली. त्यांनी दुसऱ्या दिवशी शाळेत मुख्याध्यापकांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला.मुख्याध्यापकांनी निवडणुकीमुळे स्पर्धा पुढे ढकलली जाईल, असे सांगून पालकांना फसवले.
१७ ऑक्टोबर २०२४ दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड
त्याचबरोबर, या स्पर्धेसाठी ६,००० रुपये प्रति विद्यार्थिनी आणि सोबत जाणाऱ्या महिलेसाठीच्या खर्चाचा भार पालकांवरच टाकला. पालकांनी आर्थिक अडचणी असूनही हा खर्च उचलण्याची तयारी दर्शवली.दि. ९ डिसेंबर २०२४ रोजी पालकांनी लेखी निवेदन सादर केले. मुख्याध्यापकांनी परत वेळेवर स्पर्धा होईल असे आश्वासन दिले. डिसेंबरच्या अखेरीसही स्पर्धेबाबत कोणतीही ठोस माहिती न दिल्याने पालकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी यांना देखील निवेदन दिले. त्यानंतर, ३१ डिसेंबर रोजी संजय पवार यांच्या माध्यमातून पालकांवर दबाव आणला गेला. प्रकरण पुढे नेल्यास काहीही साध्य होणार नाही, असे सांगण्यात आले.दरम्यान, यवतमाळ येथील क्रीडा विभागाने (Sports Department) शाळेला स्पर्धेसाठी सूचना पाठवली असल्याचे स्पष्ट झाले.
विद्यार्थिनींना सहभागी होण्याची संधी न दिली गेल्यामुळे त्यांचे १५ गुण आणि प्रमाणपत्र हुकले
पालकांनी सर्व खर्च उचलण्याची तयारी दाखवूनही विद्यार्थिनींना सहभागी होण्याची संधी न दिली गेल्यामुळे त्यांचे १५ गुण आणि प्रमाणपत्र हुकले. हे प्रमाणपत्र सरकारी सेवेसाठी महत्त्वाचे ठरले असते.पालकांनी आरोप केला आहे की, विद्यार्थिनींच्या मेहनतीवर पाणी फेरणाऱ्या या प्रकारामुळे शाळेच्या व्यवस्थापनावर विश्वास राहिलेला नाही. राज्यस्तरीय स्पर्धेतून विद्यार्थिनींच्या यशाचा मार्ग उघडला असता, मात्र शाळेतील क्रीडा शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या वागण्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.पालकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांच्याकडे केली आहे. तसेच योग्य कार्यवाही न झाल्यास न्यायासाठी आंदोलनात्मक पावले उचलण्याचा इशारा दिला आहे.
या प्रकरणाने संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रात खळबळ माजवली आहे. शाळेतील क्रीडा शिक्षक आणि मुख्याध्यापकाच्या अशा वागण्यामुळे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासमोरील अडथळे दूर होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे