Published on
:
28 Nov 2024, 12:42 am
Updated on
:
28 Nov 2024, 12:42 am
सांगली ः वसंतदादा मार्केट यार्ड तसं सुरक्षित मानलं जातं. पण चोरीच्या घटना काही थांबलेल्या नाहीत. मंगळवारी मध्यरात्री चार दरोडेखोरांनी थेट बँकेवर डल्ला मारण्याचा डाव रचला. बँकेच्या दरवाज्यावरील अलार्मची वायरही कापली. पण अलार्मचा अलर्ट बँकेच्या अधिकार्याच्या मोबाईलवर गेला. अधिकार्याने तत्परता दाखवित विश्रामबाग पोलिसांना माहिती दिली. तोपर्यंत चोरटे पसार झाले. अलार्मचा अलर्ट गेल्याने दरोड्याचा प्लॅन फसला.
मार्केट यार्डात यापूर्वीही चोरीच्या घटना घडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी सराईत गुन्हेगाराने एका दुकानात चोरी केली. पोलिसांना माहिती मिळताच त्याला मार्केट यार्डात घेरले. तो पत्र्यावर चढून बसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मार्केट यार्डापासून काही अंतरावर असलेल्या ‘रिलायन्स ज्वेल्स्’वरील दरोडा राज्यभर गाजला. मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास मार्केट यार्डातील तासगाव बँकेत चार दरोडेखोर घुसले. त्यांनी आधीच बँकेची रेकी केली असावी. बँकेच्या दरवाजावरील अलार्मची वायर कापली. आत प्रवेश केल्यानंतर सीसीटीव्ही वळविले. चोरट्यांनी तोंडाला कापड गुंडाळले होते. अलार्मशी छेडछाड केल्याने त्याचा अलर्ट मॅसेज बँकेच्या अधिकार्यासह आयटी विभागातील कर्मचार्यास गेला. मध्यरात्री दोन वाजता आलेला अलर्ट मेसेज पाहून अधिकारीही घाबरले. प्रसंगावधान दाखवत त्यांनी मोबाईलवरच बँकेतील सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्यात चोरटे बँकेत शिरल्याचे दिसून येताच पोलिसांच्या आपत्कालीन 100 क्रमांकावर फोन केला. काही मिनिटातच पोलिस मार्केट यार्डाकडे धावले. त्यांची चाहुल लागताच दरोडेखोरांनी धूम ठोकली. बँक अधिकारी आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे लुटीचा डाव फसला.
मुख्य रस्त्यावर सीसीटीव्हीची गरज
मार्केट यार्डात चार ते पाच गल्ल्या आहेत. बहुतांश व्यापार्यांनी आपल्या दुकानात सीसीटीव्ही बसविले आहेत. पण गल्ल्यांत सीसीटीव्ही नाहीत. मध्यंतरी पोलिसांनी व्यापारी, उद्योजकांची बैठक घेऊन सीसीटीव्ही बसविण्याचे आवाहन केले होते. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी पदभार हाती घेतल्यानंतर सीसीटीव्हीचा उपक्रम हाती घेतला होता. पण मार्केट कमिटी याबाबत फारशी गंभीर नसल्याचे दिसून येते.
मार्केट यार्डातील दिवे बंद
हजारो कोटींची उलाढाल असलेल्या वसंतदादा मार्केट यार्डाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह आहे. पोलिसांनी मध्यरात्री यार्डात प्रवेश केला. तेव्हा बहुतांश दिवे बंद होते. अंधारामुळे चोरट्याचा माग काढण्यात पोलिसांनाही अडचणी आल्या. चोरटे कुठून आत आले? दरोड्याचा प्रयत्न फसल्यानंतर ते कुठून बाहेर पडले, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.