Published on
:
16 Nov 2024, 11:39 pm
वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामुळे (आयएसएस) ‘नासा’चे टेन्शन वाढले आहे. गेल्या पाच वर्षांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात किरकोळ वायू गळती होत होती; मात्र आता किमान 50 ठिकाणी गळतीची समस्या उद्भवल्याचे स्पष्ट झाले असून या केंद्राला तडेदेखील जात असल्याची माहिती पुढे आली आहे. नासाने केलेला तपास अहवाल लीक झाला असून त्यात ही माहिती पुढे आली आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून पडलेल्या सुनीता विल्यम्ससह आणखी काही अंतराळवीरांचा जीव धोक्यात आला आहे. पृथ्वीच्या कक्षेत फिरणार्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या प्रयोगशाळेला सूक्ष्म हादरे बसत असल्याचा दावा रशियाने केला आहे. यावर नासाचे म्हणणे आहे की, अंतराळ स्थानकातून मोठ्या प्रमाणात हवा बाहेर पडत आहे, ही धोक्याची घंटा आहे. मात्र, या केंद्रात अडकून पडलेल्या अंतराळवीरांचे प्राण वाचवण्यासाठी आणि या लिकेजवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयएसएसमधील गळतीची समस्या गेल्या पाच वर्षांपासून आहे.
सगळ्यात पहिली वायू गळती ही डॉकिंग पोर्टवर जाण्यासाठी अंतराळ स्थानकात तयार करण्यात आलेल्या पहिल्या यावेझदा मॉड्यूलमधून सुरू झाली. या भागाचे नियंत्रण रशियाच्या हातात आहे. मात्र, गळतीचे खरे कारण काय याबाबत नासा आणि रशियन स्पेस एजन्सी रोस्कोमोस यांच्यात अद्याप सहमती झालेली नाही. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, नासाचे अंतराळवीर बॉब कबाना यांनी सांगितले की, अंतराळ संस्थेने या गळतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. गळती थांबविण्यासाठी काही प्रयत्न केल्यास या समस्येपासून काही काळ दिलासा मिळू शकेल, पण त्यापासून कायमस्वरूपी तोडगा काढता येणार नाही, असे कबाना यांनी सांगितले. सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक सुरक्षित नसल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. ही गळती 2019 मध्ये पहिल्यांदा आढळून आली होती. त्यानंतर एप्रिल 2024 पासून दररोज 1.7 किलो वेगाने हवेची गळती सुरू झाली. साधारणपणे आयएसएसवर सात ते दहा अंतराळवीर असतात. रशियन संशोधकांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात सूक्ष्म कंपणं जाणवत असल्याचे म्हटले आहे. हा धोका टाळण्यासाठी नासाने काही पावले उचलली आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात असलेले अंतराळवीर देखील अतिरिक्त खबरदारी घेत आहेत.