सांगली : वयं अवघं चार वर्षे... हसतं खेळतं वय... बदामाच्या झाडाखाली खेळायला गेली... अन् कळी फुलण्याआधीच कोमजली... अ, आ, ई... गिरविण्यासाठीदेखील तयार नसणार्या हातावर हैवानाने ओरखडले, ओरबाडले... हे कमी की काय? म्हणून, तिचा अंत करूनच तो शांत झाला... या घटनेचे सांगली जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले.
करजगी... जेमतेम दोन ते अडीच हजार लोकवस्तीचे गाव. याच गावात चार वर्षांची चिमुकली कुटुंबासमवेत राहत होती. सकाळी घराच्या परिसरात खेळणं हा तिचा नित्य दिनक्रम... परंतु गुरुवारची सकाळ चिमुकलीसाठी शेवटची ठरली. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास खेळता-खेळता चिमुकली गावातीलच हैवानाच्या घराजवळ पोहोचली. अंगणात पडलेले बदाम गोळा करण्यात चिमुकली व्यस्त होती. त्या इवल्याशा जिवावर त्या हैवानाची नजर पडली.पिसाटलेल्या हैवानाने एका पत्र्याच्या खोलीत तिला ओढत नेले अन् तिच्यावर अत्याचार केला. एखाद्या हॉररपटासही लाजवेल, अशी घटना करजगी गावात घडत होती. हैवान अत्याचार करून थांबला नाही, तर त्याने चिमुकलीचा, जगाची पुरती ओळख होण्याआधीच अंत केला.
चिमुकली बेपत्ता झाल्यानंतर नातेवाईक, गावकर्यांनी दवंडी पिटत शोध मोहीम सुरू केली. गावात पोलिस दाखल झाले. पोलिसांसमवेत हैवानदेखील शोध मोहिमेत सहभागी झाला होता. शोधमोहीम सुरू असताना संशय बळावल्याने पोलिसांची नजर हैवानावर पडली, अन् या घटनेचा भांडाफोड झाला. शुक्रवारी या घटनेच्या निषेधार्थ बंद पाळण्यात आला अन् निषेध मोर्चा काढण्यात आला. जागोजागी टायर पेटवून आंदोलनदेखील करण्यात आले. ही या घटनेची पार्श्वभूमी...
तुंग अत्याचाराची पुनरावृत्ती
अशीच घटना काही वर्षापूर्वी मिरज तालुक्यातील तुंग गावामध्ये घडली होती. तुंगमध्ये दुकानात खाऊ आणण्यासाठी गेलेल्या चिमुकलीवर अल्पवयीन तरुणाने उसाच्या शेतात नेऊन तिला अश्लील चित्रफीत दाखवून अत्याचार केले. त्यानंतर तिचा निर्घृणपणे खून केला होता. या घटनेतदेखील बेपत्ता मुलीच्या शोध मोहिमेत आरोपीच सक्रिय होता. गुन्ह्याचा लवलेशही त्याच्या चेहर्यावर नव्हता. त्या आरोपीवर पोलिसांची नजर पडली. त्याला केंद्रस्थानी ठेवून तपास करण्यात आला अन् तिसर्या दिवशी घटनेचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर हा खटला जलदगती न्यायालयात चालवून त्याला जन्मठेपची शिक्षा ठोठावण्यात आली. अल्पवयीन आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्याची ही पहिलीच घटना ठरली होती. तुंगमध्ये झालेल्या घटनेची पुनरावृत्ती करजगी गावात घडली.
तुंगमध्ये खाऊ आणण्यासाठी गेलेल्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आले होते अन् करजगीमध्ये खेळण्यासाठी गेलेल्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आले. या घटनेचे देखील तीव्र पडसाद सांगली जिल्ह्यात उमटले.
करजगी घटनेचे जिल्ह्यात पडसाद उमटत असताना गावात मात्र स्मशानशांतता होती. गावच्या पारावर बसलेल्यांपासून ते सांगली जिल्ह्यातील प्रत्येक गावातील व्यक्ती या घटनेमुळे हळहळत आहे. चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज सर्वजण जात, पात विसरून रस्त्यावर उतरल्याचे पाहावयास मिळाले. संखमधील शाळेतील विद्यार्थिनींनी नराधमाला फाशीची शिक्षा करावी, अशी मागणी करत आहेत. गावात सर्वत्र मन सुन्न करणारे वातावरण आहे.
चिमुकलीसाठी सर्वजण एकवटले
करजगी गावात चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना वार्यासारखी जिल्ह्यात पसरली. जो तो चिमुकलीच्या हत्येचा निषेध करीत आहे. संशयिताला कठोर शिक्षा देण्याची मागणी करीत आहे. संबंधित चिमुकलीसाठी सर्वजण जात-पात विसरून एकवटले.
हैवानाने परिसीमा ओलांडली...
एकादा पिसाटलेला हैवान कोणत्या थराला जाऊ शकतो, याचे करजगी येथील घटना उदाहरण आहे. हैवानाने घरासमोर पडलेले बदाम गोळा करत असलेल्या बालिकेला पत्र्याच्या शेडमध्ये नेले. अत्याचार केले. अत्याचारानंतर चिमुकलीचा खून करून तिचा मृतदेह एका पोत्यात भरून पत्र्याच्या पेटीत बंद करून ठेवला. एवढी मोठी घटना केल्यानंतर खरे तर पश्चाताप व्हायला हवा. पण संशयिताच्या चेहर्यावर याचा लवलेश दिसत नव्हता, असे करजगीमधील ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे अशा पिसाटांना कठोर शिक्षा देणे, हाच त्या चिमुकलीसाठी न्याय होऊ शकतो, असे बोलले जात होते.