Published on
:
25 Nov 2024, 12:39 am
Updated on
:
25 Nov 2024, 12:39 am
कागल : कागल विधानसभा मतदारसंघात हसन मुश्रीफ यांना सहाव्या निवडणुकीमध्ये कागल तालुक्याने अंदाजे 7 हजारांचे मताधिक्य देऊन विजयाचा पाया घातला, तर गडहिंग्लज शहर व आजरा तालुक्याने सुमारे साडेचार हजारांवर मताधिक्याने विजयाचा कळस चढवला. यामध्ये विकासाच्या मुद्द्यांऐवजी बहिणींच्या पाठ राखणीचा फायदा अधिक झाला असला, तरी समरजित घाटगे यांना मिळालेल्या 01 लाख 33 हजार 688 इतक्या मतांनीही लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे त्यांची ही कडवी झुंज लक्षवेधी ठरली आहे.
निवडणुकीत अफवांचे पीक आले. आरोप-प्रत्यारोपाने प्रचार सभा गाजल्या. पक्षांतराने गावागावांत चर्चा झाल्या. सोशल मीडियाचा वारेमाप वापर झाला. गेली महिनाभर प्रचाराचा महाधुरळा उडाला होता. मुश्रीफ यांनी मुत्सद्देगिरी दाखवून दिली. अनेक वर्षांच्या अनुभवाचे राजकारणातील डाव प्रतिडाव त्यांनी या निवडणुकीत पद्धतशीर आणि हुशारीने टाकून विजय खेचून आणला. छुप्या युतीलादेखील त्यांनी अस्मान दाखवले. या निवडणुकीत 07 हजार कोटी रुपयांच्या कामांपेक्षा लाडकी बहीण गेमचेंजर ठरली. तरीदेखील उघड आणि छुपा पाठिंबा कोणाला कसा आहे? याचे कोडे शेवटपर्यंत उलगडलेले नव्हते. माजी आमदार संजय घाटगे यांनी निवडणुकीच्या अडीच महिन्या अगोदर निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा केली. त्यानंतर मुश्रीफ यांनी त्यांना जिल्हा बँकेचे संचालक पद देऊन आपल्यासोबत ठेवले. संजय घाटगे यांनी मुश्रीफ यांची चांगली पाठराखण केली. माजी खासदार संजय मंडलिक आघाडी धर्म म्हणून मुश्रीफ यांच्यासोबत होते. तर त्यांचे सुपुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी सुरुवातीला मुश्रीफ यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली, नंतर काही दिवसांनी मवाळ भूमिका घेऊन मुश्रीफ यांच्या प्रचारात कार्यरत राहिले. त्यांच्या या बदललेल्या भूमिकेची शेवटपर्यंत चर्चा होती. संजय मंडलिक यांनी प्रचार सभा घेतल्या, मात्र संजय घाटगे ज्या व्यासपीठावर असतील तिथे जाणे टाळले. मात्र राज्य स्तरावरील नेत्यांच्या सभेत व्यासपीठावर आले. मंडलिक गटाच्या भूमिकेची चर्चा शेवटपर्यंत राहिली. मंडलिक गटाबाबत व्हायरल ऑडिओ, व्हिडीओ क्लिपचीही चर्चा झाली.
समरजित घाटगे यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला असला तरी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नेटवर्कचा अभाव दिसून येत होता. राष्ट्रवादी पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभांमुळे वातावरण निर्मिती झाली. शिवाय अंडर करंटच्या चर्चा होत्या. घाटगे यांनी मुश्रीफ गटाचे अनेक कार्यकर्ते फोडले. त्याचवेळी मुश्रीफ यांनी काँग्रेसचे उमेश आपटे यांचा पाठिंबा घेऊन बेरीज केली. या निवडणुकीत विशेष करून मतदानाच्या अगोदर दोन दिवस घडलेल्या घडामोडी निवडणुकीला कलाटणी देणार्या ठरल्या. काही नेत्यांच्या प्रभावाखालील गावांमध्ये मताधिक्यामध्ये वाढ झाली असली, तरी प्रभाव टाकणार्या मताधिक्याचा अभाव दिसून आला.