Published on
:
25 Nov 2024, 12:27 am
Updated on
:
25 Nov 2024, 12:27 am
चंद्रशेखर माताडे, कोल्हापूर
काँग्रेस, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणार्या कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर या दक्षिण महाराष्ट्रात महायुतीने जोरदार मुसंडी मारत हे बालेकिल्ले उद्ध्वस्त केले आहेत. कोल्हापूर व सातार्यात सर्वच्या सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. केवळ सांगली आणि सोलापूरने काँग्रेस राष्ट्रवादीची लाज राखली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीला इतका नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला आहे की, येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी बालेकिल्ल्याची बांधबंदिस्ती केली नाही, तर या निवडणुकीतही पराभवाची कडवट चव त्यांना चाखावी लागेल. 37 पैकी 29 जागांवर महायुती, तर 7 ठिकाणी महाविकास आघाडीला यश मिळाले. एक जागा शेतकरी कामगार पक्षाला मिळाली आहे.
परंपरागत नेतृत्वाने स्वत:कडेच ठेवेलेली पदे यामुळे मोठ्या प्रमाणावर तरुण पिढी पर्याय शोधत होती. 1995 पासून या प्रक्रियेला वेग आला. देशात राममंदिराचे आंदोलन सुरू झाल्यानंतर तरुणवर्ग मोठ्या प्रमाणावर या आंदोलनात उतरला तेथून त्यांना भाजप आणि शिवसेनेच्या रूपाने पर्याय उपलब्ध झाला. यातूनच 1995 मध्ये राज्यात शिवसेेना- भाजपचे सरकार आले. तरुण नेतृत्वाला संधी मिळाली. 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर तरुणांना आणखी एक पर्याय उपलब्ध झाला. त्यांनी राज्यात पुन्हा सत्तांतर घडविले.
तरुणांच्या अपेक्षा, व्होट जिहादचा प्रचार, लाडकी बहीणसारख्या लोकप्रिय घोषणांचा महायुतीला फायदा झाला. त्याचवेळी शिवसेनेतील फूट व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीने या दोन्ही पक्षांत मुख्य नेतृत्व राहिले, तरी दुसर्या फळीतील नेते निघून गेले. आता या दोन्ही मूळ पक्षांसमोर संघटना बांधणीचे आव्हान असेल.
कोल्हापुरात 10 पैकी 10 जागा महायुतीला मिळाल्या, तर सातारा हा काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला भुईसपाट झाला. जिल्ह्यातील आठही जागा महायुतीला मिळाल्या. या अपयशाला जबाबदार कोण? काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी आणि ठाकरे शिवसेनेचे नेते याचा विचार करतील; पण वाटचालीचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर या जिल्ह्यात आहेे.
सांगली आणि सोलापूरने काँग्रेस, राष्ट्रवादीची लाज राखली असेच म्हणावे लागेल. या जिल्ह्यांनी महायुतीच्या वादळात काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार व ठाकरे शिवसेनेचा दिवा लावण्याचे काम केले. सांगलीत महायुती 6, शरद पवार राष्ट्रवादी 2 ठिकाणी यशस्वी झाली आहे, तर सोलापूर जिल्ह्यात भाजपला 5, शरद पवार राष्ट्रवादीला 4, ठाकरे शिवसेना 1 व शेतकरी कामगार पक्षाला 1 जागा मिळाली. शहाजीबापू पाटील यांचा पराभव झाला. ते त्यांच्या खास स्टाईल वक्तव्याने राज्यभर गाजले.