Published on
:
08 Feb 2025, 12:32 am
Updated on
:
08 Feb 2025, 12:32 am
कोल्हापूर ः धार्मिक, ऐतिहासिक शहर म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली नसल्याने विकासाच्या बाबतीत या शहराची गळचेपी होत आहे. रस्ते, क्रीडांगणे, उद्याने, वाहनतळ यासाठी शहरात आता जागाच शिल्लक नसल्याने शहरवासीयांचा श्वास कोंडला जात आहे. कोल्हापूरच्या पाठीमागून पुणे, नाशिक, सोलापूर, औरंगाबादसह शेजारच्या सांगली शहराची हद्दवाढ होऊन ही शहरे विकासाच्या बाबतीत पुढे गेली. 69 वर्षांपूर्वी जेवढे क्षेत्र कोल्हापूरसाठी उपलब्ध होते, तेवढेच क्षेत्र आताही उपलब्ध असून, लोकसंख्या मात्र सहापटीपेक्षा जास्त झाली आहे.
1972 मध्ये कोल्हापूर नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत झाले. त्यावेळी कोल्हापूरचे क्षेत्र 66.82 चौरस किलोमीटर इतके होते. आजही तेवढेच क्षेत्र आहे. त्यापूर्वीदेखील 1946 मध्ये कोल्हापूर बोर्ड अस्तित्वात असतानाही शहराची हद्द ही 66.82 चौरस किलोमीटर होती. गेल्या 69 वर्षांत याच जागेत सार्वजनिक सुविधा, रहिवास, रुग्णालये, क्रीडांगणे आदीची उभारणी झाली आहे. आता 69 वर्षांत कोल्हापूरचा विकास टप्प्याटप्प्याने होत आहे. 2011 च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ही 5 लाख 48 हजार इतकी आहे. ढोबळमानाने अंदाज काढला, तर 2025 मध्ये ही लोकसंख्या 7 लाखांपर्यंत गेली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शहराच्या बाजूच्या आणि 20 किलोमीटर अंतरापर्यंतचे दररोज 3 लाख लोक शहरात नोकरी, व्यवसायानिमित्त ये-जा करत असतात. वाहतूक कोंडी, अस्ताव्यस्त पार्किंगमुळे सोयीसुविधांवर ताण पडत आहे. त्यामुळे हद्दवाढ ही काळाची गरज आहे. नैसर्गिकरीत्या हद्दवाढ व्हायलाच हवी. तशी मागणी आता कोल्हापूरकरांतून होत आहे.
हद्दवाढीसंदर्भात प्रस्तावित गावांत भीती
हद्दवाढीनंतर घरफाळा, पाणीपट्टी वाढ होईल
जमिनीवर आरक्षण टाकले जाईल
हद्दवाढीनंतर बांधकाम परवानगीसाठी महापालिकेत हेलपाटे मारावे लागतील
बांधकाम परवाने मिळणार नाहीत. अव्वाच्या सव्वा शुल्क आकारले जाईल
हद्दवाढ समर्थकांचे म्हणणे
पाच वर्षे कोणताही कर वाढणार नाही
शेतजमिनीवर कोणतेही आरक्षण पडणार नाही
बांधकाम परवानगीची प्रक्रिया सोपी, सुटसुटीत केली जाईल
बांधकाम परवानगीमुळे नियंत्रित विकास होईल