बडची येथील घटनाfile photo
Published on
:
24 Jan 2025, 10:51 am
Updated on
:
24 Jan 2025, 10:51 am
भिगवण: गुन्हा मागे घेण्याची धमकी देत पाच जणांनी पती-पत्नीवर कोयत्याने वार करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तक्रारवाडी (ता. इंदापूर) येथील उजनी पाणलोट क्षेत्रात गुरुवारी (दि. 23) सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी भिगवण पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यासह अन्य कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
किशोर गजरे, राजेश मोरे, हिरा गजरे, विनोद मोरे आणि गणेश परदेशी (सर्व रा. तक्रारवाडी, ता. इंदापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हे सर्व जण पसार झाले आहेत. याप्रकरणी मालन ऊर्फ रेश्मा शहाजी काळे (रा. तक्रारवाडी) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी फिर्यादी मालन काळे, त्यांचे पती शहाजी व मुलगा अजय हे होडीतून उजनी पाणलोट क्षेत्रात मासेमारी करण्यासाठी गेले होते. या वेळी आरोपी देखील होडीतून त्यांच्याजवळ आले.
आमच्यावर पोलिसांत दाखल केलेला गुन्हा मागे घ्या, असे म्हणत किशोर गजरे, राजेश मोरे व साथीदारांनी शहाजी यांच्या पाठीवर कोयत्याने वार केले, यात ते गंभीर जखमी झाले.
या वेळी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला असता मालन यांच्याही उजव्या मनगटावर कोयत्याने वार करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी दोघांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तर अजय मोरेला ‘जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
त्यानुसार पोलिसांनी संबंधितांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच बेकायदेशीर जमाव जमवणे, हत्यार घेऊन दंगल माजवणे, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे आदी कलमांतर्गत आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. बारामतीचे विभागीय पोलिस अधिकारी या घटनेचा तपास करीत आहेत.