Published on
:
18 Jan 2025, 12:25 am
Updated on
:
18 Jan 2025, 12:25 am
पणजी : दोन वर्षांपूर्वी बार्देश तालुक्यातील शिरसई येथे एक धक्कादायक घटना घडली होती. एका आईने वैतागून रागाच्या भरात आपल्या पाच महिन्यांच्या मुलीवर लाटण्याच्या साहाय्याने वार केला होता. यात मुलीची हत्या झाली होती. दरम्यान, याप्रकरणी बाल न्यायालयाने आई आर्मिंदा डोरा फर्नांडिस हिला जन्मठेप आणि 1.10 लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. याबाबतचा आदेश बाल न्यायालयाचे अध्यक्ष सई प्रभुदेसाई यांनी दिला आहे.
बाल न्यायालयाने या खून प्रकरणी आई आर्मिंदा डोरा फर्नांडिस हिला भादंसंच्या कलम 302 (खून) अंतर्गत जन्मठेप आणि 10 हजार रुपये दंड. दंड न भरल्यास एक वर्षाची साधी कैद. तर गोवा बाल कायद्याचे कलम 8 अंतर्गत तीन वर्षांचा सश्रम कारावास आणि 1 लाख रुपये दंड. दंड न भरल्यास दोन वर्षांची साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणी कोलवाळ पोलिसांनी 14 ऑगस्ट 2022 रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, कपेलवाडा शिरसई येथील पाच महिन्यांच्या चिमुकलीचे वडील सुदन गोंडलेकर यांनी 14 ऑगस्ट 2022 रोजी उत्तररात्री 3.30 च्या सुमारास चिमुकलीला रक्ताच्या थारोळ्यात बास्केटमध्ये घालून कोलवाळ पोलिस स्थानकात आणले होते. पोलिसांनी त्वरित चिमुकलीला म्हापशातील जिल्हा इस्पितळात दाखल केले असता डॉक्टरांनी तिचा आधीच मृत्यू झाल्याचे जाहीर केले. या प्रकरणी तत्कालिन पोलिस उपनिरीक्षक मंदार परब यांनी तक्रार दाखल केली होती.
त्यानुसार, तत्कालिन पोलिस निरीक्षक सोमनाथ माजिक यांनी चिमुकलीच्या खून प्रकरणी आई वडिलांना ताब्यात घेतले व या दोघांविरोधात भारतीय दंड संहितेच्या 302 व गोवा बाल कायदा कलम 8 नुसार गुन्हा नोंद केला. पोलिसांच्या चौकशीत त्या दोघांनी आपला जबाब वारंवार बदलला होता. कसून चौकशी केली असता, आई आर्मिंदा डोरा फर्नांडिस हिने रागाच्या भरात मुलीला हातातील लाटण्याने मारहाण केली होती. त्यातच तिचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी वडिलांना सोडले आणि आईला अटक केली होती.
तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी आईच्या विरोधात 30 साक्षीदारांची साक्ष नोंदवून 200 पानी आरोपपत्र म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात दाखल केले. हे प्रकरण बाल न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत असल्यामुळे तिथे वर्ग करण्यात आले. न्यायालयात सरकारी वकील मिलैना पिंटो आणि थेमा नार्वेकर या दोघांनी बाजू मांडून पुरावे सादर केले. त्यानंतर बाल न्यायालयाने चिमुकलीची आई आर्मिंदा डोरा फर्नांडिस हिला दोषी ठरविले.