Published on
:
25 Nov 2024, 12:01 am
Updated on
:
25 Nov 2024, 12:01 am
’न्यूमोनिया’ हा श्वसनमार्गाचा एक जीवघेणा संसर्ग आजार असून, यामध्ये फुफ्फुसातील पेशींना सूज येते. फुफ्फुसात हवेच्या अत्यंत छोट्या-छोट्या पिशव्या असतात. यांना ’अल्वेओली’ असं म्हटलं जातं. यामध्ये जंतूसंसर्ग झाल्यामुळे न्यूमोनिया होतो. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कोणालाही ’न्यूमोनिया’चा त्रास होऊ शकतो.
ज्येष्ठांच्या शरीराची प्रतिकारशक्ती वयपरत्वे फारशी चांगली नसते. त्यामुळे औषधे दिली तरी फारसा परिणाम होत नाही. शरीर रोगाशी लढण्यास तितकंसं सक्षम राहत नाही, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती उपचारांना योग्य प्रतिसाद देऊ शकत नसल्याने तब्येत आणखी बिघडते आणि रोगही वाढतो. प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यामुळे न्यूमोनिया होतो. अशावेळी फुफ्फुसावर परिणाम होऊन त्यांची मारक क्षमता वाढते. छातीत दुखणे आणि खूप ताप यासारख्या लक्षणांसह वयस्कर रुग्णांमध्ये गोंधळ उडणे किंवा हालचाल अचानक कमी होणे यासारखी लक्षणे दिसतात आणि त्यांना अचानक रुग्णालयामध्ये दाखल करावे लागते.
वृद्धांमध्ये न्यूमोनिया अनेक अंतर्गत कारणांमुळे उद्भवतो, जसे की वाढत्या वयामुळे कमकुवत झालेली रोगप्रतिकारक शक्ती, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी), मधुमेह किंवा हृदयरोग, जीवनशैलीचे घटक जसे की आहाराच्या चुकीच्या सवयी किंवा शारीरिक हालचालींच्या अभावामुळे फुफ्फुसाचे कार्य कमकुवत होऊ शकते आणि लवकर बरे होण्याची क्षमता कमी होते.
खोकला, ताप आणि थंडी वाजून येणे, छातीत दुखणे, थकवा येणे, धाप लागणे आणि जलद श्वास घेणे. यामुळे दैनंदिन कामे सहजतेने करण्याच्या क्षमतेत व्यत्यय येऊ शकतो. वृद्ध लोकांमध्ये गोंधळ उडणे, श्वास घेताना दम लागणे, शरीराचे तापमान वाढणे आणि छातीत असह्य वेदना होणे यासारखी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
निदान करण्यासाठी रक्त चाचण्या, सीटी स्कॅन आणि एक्स-रे च्या मदतीने याचे निदान केले जाऊ शकते. डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
उपचारांमध्ये अँटिबायोटिक्स, अँटिव्हायरल औषधे आणि सपोर्टिव्ह केअर तसेच पुरेशी विश्रांती घेणे यांचा समावेश आहे. वेळेवर उपचार केल्यास श्वसनक्रिया बंद पडणे, फुफ्फुसासंबंधित सिस्ट, सेप्सिस, फुफ्फुसात द्रव साचणे आणि मृत्यू ओढावण्यासारख्या गुंतागुंत टाळण्यास मदत होईल.
न्यूमोकोकल आणि इन्फ्लूएंझा लस घेणे, हातांची स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, मास्कचा वापर करणे, वारंवार स्पर्श केलेल्या पृष्ठभागाचे निर्जंतुकीकरण करणे, गर्दीच्या ठिकाणी फिरणे टाळावे. तसेच आजारी व्यक्तींशी थेट संपर्क टाळा, धूम्रपान टाळा, संतुलित आहाराचे सेवन करा. न्यूमोनियापासून बचाव करण्यासाठी दररोज व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या आणि फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी शरीर हायड्रेटेड राखा.