नाशिक सिन्नर येथील राष्ट्रवादीचे आमदार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा एका कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. यावेळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या भाजपा ते राष्ट्रवादीच्या प्रवासावर मंथन करताना भाजपात आला त्याला तिकीट मिळते. पण मला नाही मिळाले, कदाचित भाजपा पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता असे उद्गार कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी काढले आहेत.त्याला उत्तर देताना भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी ते भाजपाच्या पायगुणामुळे मंत्री झाले आहे. जर भाजपाचे सरकार आले नसते ते मंत्री तरी झाले असते का ? याचे भान त्यांनी ठेवावे असा सल्लाही दरेकर यांनी दिला आहे.
एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर संपलेली आहे. २०२४ नंतर सुद्धा आपण मुख्यमंत्री राहणार असे वचन एकनाथ शिंदे यांना दिले होते. परंतू ते पाळले गेले नाही आणि त्यांना खड्यासारखे बाजूला काढले आहे. त्यामुळे त्यांचा चेहरा पाहीला तर ते अजूनही गुंगीत किंवा धक्क्यात आहेत असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. यावर प्रतिक्रीया देताना दरेकर म्हणाले की संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांची जास्तच काळजी वाटते. संजय राऊत हे एकनाथ शिंदे यांची वकिली कधीपासून करू लागले ? उद्धव ठाकरे यांची काळजी घेण्याऐवजी ते आता शिंदे यांची काळजी घ्यायला लागले आहेत. निष्ठा नक्की कोणाकडे आहे? एकेकाळी त्यांची निष्ठा शरद पवारांकडे होती. आता “त्याची टोपी ह्याला,ह्याची टोपी त्याला” असा खेळ सुरू केला आहे. संजय राऊत यांनी फुटकळ बोलणं बंद करावं. आमच्यात सगळं काही आलबेल , तुमचं तुम्ही पाहा… शिंदेंची काळजी करू नका, आम्ही सगळे एकत्र आहोत असे भाजपानेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
तीन प्रमुख नेते एकत्र बसतील त्यावेळी…
बालाजी किणीकर यांच्या मतांशी सहमत नाही, भाजपने काम केलं नाही असं म्हणणं योग्य ठरणार नाही. भाजपच्या प्रत्येक आमदारांनी आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्यांच्या मतदारसंघांमध्ये जो कोणी उभा आहे त्या सगळ्यांची काम केलेली आहे. त्यांचा काहीतरी गैरसमज झालेला असेल, उद्वीग्न भावनेतून ते बोलत आहेत असं वाटतंय असे दरेकर यांनी म्हटले आहे. अशोक चव्हाण यांनी जी भूमिका मांडली आहे ती पक्षाची भूमिका नाहीए…ती त्यांची वैयक्तिक भूमिका असू शकते. हेमंत पाटील यांनी त्यावर जुना निवाडा काढलाय तो देखील त्यांच्या पक्षाचा निर्णय नाहीए ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे, जेव्हा तीन प्रमुख नेते एकत्र बसतील त्यावेळी ते निर्णय घेतील त्यामुळे खाली नेते काय म्हणतात याला काही अर्थ राहत नाही महायुतीमध्ये समन्वय बिघडेल अशी वक्तव्य कोणीही करता कामा नये असेही दरेकर यांनी म्हटले आहे.